मराठी मालिका विश्वात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नुपूर दैठणकर (Nupur Daithankar) दुसऱ्यांदा आई झाली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले. ही खुशखबर तिने नुकतीच सोशल मीडियावर दिली आहे. याआधी तिला एक मुलगा असून आता तिचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे.
अभिनेत्री नुपूर दैठणकर हिने इंस्टाग्रामवर आई झाल्याची आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी तिने मॅटरनिटी फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत ती तिचा नवरा सौरभ आणि मुलगा रेयांश पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ''अक्षय्य तृतीयेच्या (३० एप्रिल) शुभ प्रसंगी, आमच्या हृदयाला आणि घराला एक मौल्यवान भेट मिळाली आहे. रेयांश आता एक अभिमानी मोठा भाऊ आहे... कारण आपण आपल्या छोट्या राजकुमारीचे जगात स्वागत करतो.कृतज्ञ. खूप आनंदी. पूर्ण.'' नुपूरच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नुपूर दैठणकर ही बालपणापासूनच आई स्वाती दैठणकर यांच्याकडून भरतनाट्यमचे धडे गिरवत होती. तिचे वडील धनंजय हे देखील संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. यातूनच नुपुरला जावई विकत घेणे आहे मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौरभ बाग यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांना रेयांश हा मुलगा असून आता मुलीच्या जन्मानंतर त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे.