Join us

"तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...", घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:38 IST

मुंबई किंवा ठाण्यामध्ये प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्डे यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

Marathi Actress : मुंबई किंवा ठाण्यामध्ये प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्डे यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात मागील काही दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील खड्ड्यांचा मुद्दा हा चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल व्यथा मांडल्या आहेत. तरीही परिस्थिती जैसे थे आहे. या रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे. दरम्यान, अभिनेता शशांक केतकर, जुई गडकरी तसेच आस्ताद काळे या कलाकारानंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने घोडबंदर रोडची दुरावस्था दाखवणारा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाला जाब विचारला आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे आहे. 

अभिनेत्री सुरभी भावे ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यामाध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर ती व्यक्त होताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीने घोडबंदर रोडच्या दुरावस्थेचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सुरभीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय, "दिवसाचा प्रहर कोणताही असो घोडबंदर रोड इतका जॅम का असतो आणि जर या रोडबद्दल कोणालाही काही आस्था नसेल तर मग प्रश्नच मिटला. रोज ठाणे ते मढ प्रवास करताना सगळ्यांच्याच कमरेचा चक्काचूर होतो. वेळ वाया जातो. ज्या प्रवासासाठी एक तास लागतो त्याच्यासाठी अडीच तास वेळ जातोय. पण, काय करणार बाकी कोणाला काहीच पडलेली नाही. आम्ही कलाकार व्हिडीओ बनवतो आणि त्याच्या बातम्या बनतात. याच्यापुढे काहीच घडत नाही"

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली,"सर्व सन्माननीय मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही कधी घोडबंदर रोडवरुन प्रवास केलाय का. त्या रोडवरुन गेला नसाल तर प्लीज जा आणि शक्य असेल तर तुमच्या फॉर्चूनर अशा मोठ्या गाड्या बाजूला ठेवून सामान्य नागरिक कसा प्रवास करतो हे बघा. मी या रस्त्यावरून रोज रिक्षाने पण आज म्हटलं गाडीने प्रवास करुया. तरीही चित्र तेच आहे. या सर्व सन्माननीय लोकांना विनंती... आओ घोडबंदर रोड पे... मज्जा येईल. असं म्हणत अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. "चंद्र लांब असला तरी तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...",असं कॅप्शन देखील अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

सुरभी भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'भाग्य दिले तू मला', 'स्वामिनी',  'राणी मी होणार' ,'सख्या रे' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत वल्लरी नावाची भूमिका साकारताना दिसते आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमुंबईवाहतूक कोंडी