'छत्रीवाली', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सायली साळुंखे (Sayli Salunkhe) हिंदी कलाविश्वातही तितकीच सक्रिय असल्याची पाहायला मिळतेय. 'मेहंदी है रचनेवाली', 'पुकार दिल से दिल तक', 'बातें कुछ अन कहीं सी' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. सध्या सायली साळुंखे सोनी सब वाहिनीवरील 'वीर हनुमान' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. अशातच नुकताच अभिनेत्री सायली साळुंखेने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. यादरम्यान, तिने तिच्या अभिनय प्रवासासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
>>> सुजित शिर्के
अभिनय क्षेत्रात करिअर करायचे का ठरविले?
खरं सांगायचं झालं तर, मला कधीच वाटलं नव्हतं की मी या क्षेत्रात कधी येईन, किंवा कधी असं ठरवलं सुद्धा नव्हतं. मला लहानपणापासून एक डान्सर व्हायचं होतं. माझं हेच स्वप्न होतं की माझा एक डान्स क्लास असेल. मी सरोज यांना बघून मोठी झाली आहे. तर प्रत्येकवेळी माझं एक स्वप्न असायचं की माझा एक डान्स क्लास असेल आणि त्यांच्यासारखी उत्तम कोरिओग्राफर होईन. पण नशिबात ज्या गोष्टी असतात तेच घडतं. सगळ्या प्रवासात माझ्या कुटुंबीयांची साथ होती आणि माझ्या वडिलाचं नेहमी हेच म्हणणं असायचं की आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तेच करा. हे सगळं त्यांच्या सपोर्टमुळे शक्य झालं आहे. याचा कधीच विचार केला नव्हता. पण, असंच काही नाटकं वगैरे करताना काहींना मला विचारलं की तू शो करशील का? त्यानंतर मग अभिनयाची आवड निर्माण झाली आणि आता जवळपास सात शो नंतर 'वीर हनुमान' करते आहे.
हिंदी मालिकेसाठी पहिली संधी कशी मिळाली?
मला वाटतं सगळ्यांनाच या शोबद्दल माहीत असेल की, 'आई माझी काळूबाई' ही मालिका होती. त्या मालिकेसाठी मला फोन आला. एक रिप्लेंसमेंट होती, त्यासाठी मला एक फोन आला. त्यासोबत ऑडिशनदरम्यान मला एका हिंदी मालिकेची ऑफर आली त्यामध्ये बहिणीचा रोल होता. तेव्हा मी खूप कनफ्यूज होते.त्यावेळी माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. माझ्याकडे तेव्हा दोन पर्याय होते हिंदीत एक पर्याय होता आणि मराठीत लीड करण्याची संधी होती. त्यादरम्यान, मी हिंदीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पण, लोकं मला म्हणायचे की तू हिंदीत चांगलं काम करशील. खरंतर माझ्यासाठी कोणतंही माध्यम वेगळं नव्हतं. शिवाय मी मराठी किंवा हिंदीमध्ये काम नाही करणार, असंही काही नव्हतं. मला सगळ्या माध्यमात काम करायचं आहे. ती माझी पहिली मालिका होती 'मेहंदी है रचनेवाली'.
'मेहंदी है रचनेवाली' मालिकेमुळे घराघरात नवी ओळख मिळाली, ही मलिका करिअरला कलाटणी देणारी ठरली का?
'मेहंदी है रचनेवाली' ही मालिका करिअरला कलाटणी देणारी ठरली असं नाही म्हणता येणार पण, मी या मालिकेच्या निर्मात्यांना सगळं श्रेय देईन. कारण, 'मेहंदी है रचनेवाली' मालिकेचे निर्माते होते ज्यांनी माझा सगळा प्रवास पाहिला, ज्यांनी मला त्या मालिकेनंतर आणखी एका शोची ऑफर दिली. त्या मालिकेदरम्यान ते मला म्हणाले होते की, "सायली मला तुझं काम खूप आवडलंय आणि माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या शोमध्ये लीड करावं." तो हा जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी असेन. ते नेहमी मला सांगत असतात की तू अजून चांगलं काम करु शकतेस. तुझ्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत.
मालिकेत काम करताना आलेला एक अविस्मरणीय अनुभव, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात,सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाही पण मी एक वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट शेअर करायला आवडेल. जेव्हा मी या इंडस्ट्रीत सुरुवात करत होते तेव्हा होतं असं की आयुष्यात की आपण जेव्हा पुढे पुढे जात असतो तेव्हा आपल्याला कळतंच नाही की थांबायचं कुठे आहे. आपण त्यामध्ये वाहत जातो. तेव्हा माझे घरचे आई-वडील यांनी मला एक गोष्ट समजावली होती की, तू जे वाटतंय ते कर आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तुला पाठिंबा देऊ. पण, आयु्ष्यात असं काम कधी करु नकोस की जे आम्ही बघू शकणार नाही, ज्यामुळे आम्हाला वाईट वाटेल. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवीन की मी असं काम कधीच करणार नाही जे माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांच्या विरोधात असेल.जेव्हा असे काही सीन्स असतील किंवा इतर काही असेल तर मी त्यांनी विश्वासात घेतल्याशिवाय कोणंतही काम करणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे.
मराठीमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' असो किंवा 'छत्रीवाली' असो वेगळ्या भूमिकेत तू पाहायला मिळालीस. या मालिकांमध्ये काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
मराठीमध्ये काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. मला या मालिकांद्वारे उत्तम मराठी शिकता आलं. मराठी मालिकांची ही गोष्ट मलाखूप आवडली.शिवाय आपल्याला माहित आहेच की कॉन्टेंट खूप छान आहेत.त्यामुळे मी आजही लोकांना सांगते की मला जर मराठी मालिका,वेबसिरीजसाठीसंधी मिळाली तर मी कधीच नाही म्हणणार नाही. कारण जेव्हा मी मराठी शो करत होते तेव्हा तिथे एक कुटुंबासारखी फिलिंग होतं. मला माहित नाही पण मराठीत काम करतानाआपलं घर असल्यासारखं वाटतं. हिंदी असो किंवा मराठी असो दोन्हीकडे सारखाच अनुभव आहे. पण, बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये सारखेपणा आहे. कसं असतं ना, आपला अप्रोच प्रत्येकवेळी चांगला असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. कामंही छान होतं, आणि आपला अप्रोच चुकीचा असेल तर माणसंही चुकीची भेटतात आणि काम सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपला अप्रोच किती चांगला आहे हिंदी असो किंवा मराठी असो आपण एक कुटुंबासारखं वातावरण निर्माण केलं तर सगळं व्यवस्थित होतं.
मराठीकडून थेट हिंदी मालिकांमध्ये काम केलं? त्यानंतर पुन्हा मराठीसाठी कधी विचारणा झाली का?
माझ्या करिअरच्या सुरुवातीला लीड रोलसाठी मला कधी ऑफर मिळाली नव्हती.पण, कधी-कधी आर्थिकदृष्ट्या सुद्धा विचार करावा लागतो. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या कॉन्टेंट असेल किंवा आर्थिक गोष्टी जुळून आल्या तर मला कुठेच काम करायला हरकत नाही. सध्या हिंदीमध्ये चांगलं मानधन मिळतंय, या गोष्टी बघून चालायलं लागतं. आणि कॉन्टेंटची गोष्ट असेल तर मालिका करण्यापेक्षा मी रंगभूमीवर काम करेन.कारण, रंगभूमीवर काम करायला लोकांना प्रचंड आवडतं. पण, मला संधी मिळाली तर मी नक्की करेन. याआधी 'वीर हनुमान'च्यापूर्वी एका मराठी मालिकेसाठी ऑफर आली होती पण काही कारणांमुळे ते शक्य नाही झालं.
तुला हिंदी - मराठी अशा कोणत्या सिनेमाची कधी ऑफर आली आहे का?
मला आतापर्यंत चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण, त्यामधील पात्र इतके काही स्ट्रॉंग वाटलं नाही की करावेत. एक चित्रपट केला आहे दगडी चाळ-२ हे खूप कमी लोकांना माहीत आहे. पण, मला अशी भूमिका करायची आहे जी लोकांच्या मनात कायम लक्षात राहिल. त्याचा अनुभव मी घेतला. जर मला संधी मिळाली तर चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल.
चित्रपट, मालिका की वेब सीरिज सायली आम्हाला कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार?
माझ्यासाठी तिन्ही माध्यमे सारखीच आहेत. कारण, उद्या जरी मी चित्रपट केले तरी कोणत्याच माध्यमाला मी कमी लेखणार नाही. माझ्या करिअरची सुरुवात मालिकांपासून झाली. कारण मला मालिका, चित्रपट किंवा वेबसीरिज मिळो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडेल. पण, खरंच मला मराठीत काम करायचं आहे. हिंदीत काम करताना मला बरेच जण म्हणतात, सायली मराठी कलाकार खूप मेहनती असतात, टॅलेंटेड असतात. त्यांना थिएटरचा अनुभव असतो. ते लोक मराठी कलाकारांना कायम चांगली वागणूक देतात.