Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी कलाविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासह स्पृहा एक उत्तम कवियित्री आणि निवेदिका देखील आहे. स्पृहा जोशीसोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच अभिनेत्रीने खास कविता लिहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही कविता अनेकांना विचार करायला लावणारी आहे.
स्पृहा जोशीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टद्वारे तिने स्वलिखित कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
स्पृहा जोशीची कविता....
"कॅलेंडरचं एक एक पान उलटत राहत, बघता बघता दिवस, महिने, वर्ष सरत जातं...,आता कुठे कॉलेज संपलंय.., मन म्हणत असतं, मनातल्या मनात सोळावं अजून सरलेलंच नसतं..."
"तितक्यात दिसतो वेडावणारा एक वैरी पांढरा केस, पस्तीशीत आलो नाही, सगळाच होऊन गेलाय मेस! व्हिडीओ कॉलवर सुद्धा आपण चेहरा हाईड करतो, यावर्षी ५ किलो टार्गेट फिक्स करतो..."
"५ वर्षांपूर्वीची जीन्स, आपण पाहतो अश्रू ढाळत..., डाएट आणि मोटिव्हेशनचा ढीग जातो नुसता वाढत..."
"फोटोसाठी आपोआप पोट घेतो आत, चेहरा जातो बुजत आणखी, सिरम-क्रीम्सच्या ढिगाऱ्यात..., हायलुरॉनिक, सॅलिसिलिक, पेप्टाइड्स आणि काय काय नायका आणि 'मिंत्रा'वर खोल बुडत जातो पाय..."
"घाबऱ्या घुबऱ्या हार्मोन्सच शरीरात चालू खळ खटॅक, कसे, कोण जाणे हल्ली सतत येतात पॅनिक अटॅक..., आपल्यामधली छोटी मुलगी पार गोंधळून बावरुन जाते, का कोण जाणे हल्ली सारखी आई आठवत राहते..
"आठवत राहतात जुनी जुनी माणसं आणि गाणी, डोळ्यामधून उगाच वाहत राहतं पाणी..., इन्स्टाग्रामवरती आपण उगाच स्क्रोल करतो, गर्दीमधला एकटेपणा आणखी वाढत जातो..."
"खाण्यापिण्याचं नव्हे, खरं तर इन्स्टाग्रामचं डाएट हवंय, अॅटिएजिंग युद्ध आता, जरा आपण थांबवाला हवंय..."
"परफेक्ट शरीर, परफेक्ट नाती, परफेक्ट स्वयंपाक, परफेक्ट घर..., दिखाव्याच्या हव्यासातून बाई गं... आत्ताच सावर!! "
स्पृहा जोशीच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.