'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. कालच प्राजक्ताने हाताला मेहंदी लावलेला व्हिडिओ शेअर करत साखरपुड्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. तिने अचानक ही बातमी दिल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला. आज प्राजक्ताचा साखरपुडा थाटात पार पडला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ऐकून तुम्हीही म्हणाला किती सुंदर योगायोग आहे. कोण आहे प्राजक्ताचा होणार नवरा?
ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. शंभुराज खुतवड असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात हा सुंदर योगायोग जुळून आला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत तिने शंभुरायांच्या पत्नीची महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली. तर आता खऱ्या आयुष्यातही ती शंभुराजशी आयुष्यभराची गाठ बांधणार आहे.
प्राजक्ताच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमी आहे. साखरपुड्यासाठी तिने खास लूक केलेला दिसत आहे. लाल-पांढऱ्या रंगाची साडी, लाल डिझायनर ब्लाऊज, मागे शंभुराज असं नक्षीकाम केलेलं दिसत आहे. सुंदर हेअरस्टाईल, दागदागिने, हातभर मेहंदी आणि ग्लोई मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
पाच दिवसांपूर्वी प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. तिच्या कुंकवाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यात ती नवरीसारखी नटलेली दिसली. तिच्या गळ्यात पुष्पहार होता. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, त्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…. ठरलं कुंकवाचा कार्यक्रम. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला होता. प्राजक्ताचा होणारा नवरा कोण याचा खुलासा झाला आहे. आता दोघांचं लग्न कधी याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.