'अस्मिता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी वाघ तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत होती. या मालिकेच्या सेटवरच मयुरी आणि पियुष रानडे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर दोन वर्षांतच मयुरी आणि पियुष वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आता इतक्या वर्षांनी मयुरीने प्रथमच तिच्या घटस्फोटाबद्दल मुलाखतीत भाष्य केलं आहे. या मुलाखतीत मयुरीने मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
मयुरीने मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. ती म्हणाली, "मला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. पण, मी लग्नाचा निर्णय खूपच पटकन घेतला. आताची जनरेशन मी बघतेय की लोक खूप विचार करून लग्न करतात. जे मी नाही केलं. मी बघितलंय की मुलींचही ठरलेलं असतं की एवढा पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर पाहिजे किंवा त्याच्या कुटुंबात या गोष्टी हव्यात. या बाबतीत मुलं किंवा मुली दोघांचेही विचार ठरलेले आहेत. माझं तसं नाही झालं. मी खूप घाई गडबडीत निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच कळलं की निर्णय चुकला आहे. पण, ते मला ते स्वीकारायला खूप वेळ गेला".
सहकलाकारांचा पाठिंबा
"म्हणजे जेव्हा मी ती फुलराणी शूट करत होते. तेव्हा तिथले सहकलाकार होते त्यांना माहीत होतं की हिच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. जे ती शेअर करू शकत नाहीये. पण ते माझ्यासोबत असायचे. पर्सनल आयुष्यात मी डिर्स्टब आहे हे त्यांना कळत होतं. सकाळी ८ वाजता सेटवर आल्यावर शूटिंग संपून जरी पॅकअप झालं असलं तरी ते माझ्याबरोबर असायचे. ते माझ्यासोबत घरी यायचे, आम्ही कुठेतरी भेटायचो. आणि हे ३-४ वाजेपर्यंत कधी कधी सुरू असायचं कारण मला झोप यायची नाही. आणि हे लोक माझ्यासोबत बसायचे", असं मयुरीने सांगितलं.
आईवडिलांना कळलं होतं की निर्णय चुकलाय
"माझ्या आईबाबांना पहिल्या ४ महिन्यांतच कळलं होतं की हे चुकलं आहे. पण, मला कळायला जवळ जवळ दीड वर्ष गेलं. कारण लहानपणापासूनच असं होतं की माझ्या आयुष्यात सगळं छान होणारे. त्यामुळे जेव्हा चुकीच्या गोष्टी घडत्यात हे दिसत होतं. तेव्हा असं होतं की हे होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवलाय ती व्यक्ती हे करूच शकत नाही. हे मला समजायला खूप वेळ गेला. ते स्वीकारायला खूप वेळ गेला. आणि त्यातून बाहेर येण्यासाठी निर्णय घ्यायलाही खूप वेळ गेला. पुढे जावं की थांबावं की आहे तसं सोडून द्यावं हे माझं मलाच कळत नव्हतं. नशिबाने तेव्हा मी शूटिंग करत होते. त्यामुळे जरा माझं डोकं शांत होतं. कारण मला हे पटतच नव्हतं की माझ्यासोबत हे घडू शकतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी रात्री अडीच वाजता मशीन लावायचे. रात्री किचनमधून सगळी भांडी काढून मी ते साफ करून घेतलेलं आहे. मी खूप एकटी असायचे कुणीच नसायचं. मी घरात मासे आणून ठेवलेले आणि मी त्यांच्याशी बोलायचे. मला कोणासोबत तरी या गोष्टी शेअर करायच्या होत्या. तेव्हा हे मित्र होते. पण, त्यांच्याशी हे मी बोलू शकत नव्हते".
"मी आईबाबांना अजूनही अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. कारण, त्यांना वाईट वाटेल. मी त्यांच्यासमोर रडत नाही. त्या शोमध्ये रोमँटिक ट्रॅक सुरू होता. आणि माझ्या पर्सनल लाइफमध्ये आम्ही वेगळे होत होतो. ज्याच्यावर मी १०० टक्के विश्वास ठेवलाय, काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या त्याकडे मी दुर्लक्ष केलंय. पण त्या व्यक्तीकडून विश्वासघात झाला", असंही मयुरीने सांगितलं.
शारीरिक छळ झाल्याचा खुलासा
मयुरी म्हणाली, "आपल्याकडे मुलींना शिकवलं जातं की सहन करावं लागतं. लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. पण, कधीपर्यंत हे सहन करायचं हे देखील आपण शिकवलं पाहिजे. मी त्याच्या सेटवर सरप्राइज द्यायला जायचे आणि तो तिथे नसायचा. कुठे जायचा माहीत नाही, फोन उचलायचा नाही आणि खूप रँडम स्टोरी मग ऐकायला मिळायची. गाडी पंक्चर झाली वगैरे, ज्यावर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही". शारीरिक छळ झाल्याचा खुलासाही मयुरीने मुलाखतीत केला.
Web Summary : Mayuri Wagh disclosed her divorce, citing hasty marriage, mental distress, and physical abuse. She found support from co-stars amidst personal turmoil and delayed separation due to societal expectations.
Web Summary : मयुरी वाघ ने जल्दबाजी में शादी, मानसिक तनाव और शारीरिक शोषण का हवाला देते हुए अपने तलाक का खुलासा किया। व्यक्तिगत उथल-पुथल के बीच उन्हें सह-कलाकारों से समर्थन मिला और सामाजिक अपेक्षाओं के कारण अलगाव में देरी हुई।