अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत. सध्या त्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करत आहेत. 'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या त्यांच्या याआधीच्या गाजलेल्या मालिका आहेत. लवकरच गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यापूर्वी हर्षदा खानविलकर यांनी बाप्पासोबतचं त्यांचं नातं 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्या नक्की काय म्हणाल्या वाचा.
अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सेटवरील मेकअप रुममध्ये भगवद् गीता, स्वामींचा फोटो आणि बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात,"भगवद् गीतेवर माझा विश्वास आहे. आईवडिलांनी माझ्यावर तेच संस्कार केले आहेत. कर्म करत राहा हेच आपल्याला गीता शिकवते. आमच्या एका सहकाऱ्याने मला गीतेचं पुस्तक दिलं जे मी इथे ठेवलं आहे.
गणपती बाप्पााबद्दल काय सांगू..वर्षानुवर्ष माझं बाप्पासोबत अफेअर आहे. गणपती बाप्पा हे श्रद्धास्थान नसून माझं प्रेम आहे. माझ्या वडिलांचंही ते प्रेम आहे. मूर्तीपूजा करताना, देवाचं काहीही करताना काही चुकीचं घडू नये ही भीती अनेकांच्या मनात असते. पण मला ती अजिबात नाही. कारण तो माझा मित्र, सखा आहे. तो माझी काळजी घेतो. माझ्याकडील बाप्पाच्या मूर्तींना मी नावं ठेवली आहेत. ही माझ्यासमोर जी मूर्ती आहे ती दगडूशेठची प्रतिकृती आहे. तिचं नाव मी शाहरुख ठेवलंय. माझं सगळ्यात जास्त प्रेम शाहरुखवर आहे. तसंच माझा सिद्धिविनायक आहे जो अगदी प्राईम आणि प्रॉपर आहे. त्यामुळे त्याचं नाव आमिर खान आहे. कारण तो परफेक्शनिस्ट आहे."
हर्षदा खानविलकर यांनी 'दर्द' या हिंदी मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. नंतर त्यांना 'आभाळमाया' मालिका मिळाली. त्यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणूनही इंडस्ट्रीत काम केलं आहे. आजवर त्यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.