अश्विनी कासार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कलाविश्वात काम करत असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही गाजलेल्या मालिका आणि नाटकांमध्ये तिने अभिनय केला आहे. आता अश्विनी कालनिर्णयच्या जाहिरातीत झळकली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं आहे.
अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच ती वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच अश्विनी कालनिर्णयच्या जाहिरातीत झळकली आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर केली आहे. "खरंतर स्वप्नातही वाटलं नव्हतं की 'कालनिर्णय'च्या जाहिरातीसाठी माझा विचार केला जाईल. लहानपणापासून घरात ही दिनदर्शिका बघत आले...", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "नोव्हेंबरची सुरुवात या खास गिफ्ट आणि सरप्राइजने झाली. महेश लिमये सर तुमच्यासोबत काम करणं ही कोणत्याही कलाकारासाठी एक पर्वणी आहे. कामाची कसोटी तर लागतेच पण केलेलं काम 'देखणं' दिसतं. आणि ही संधी तुम्ही मला दिलीत. त्यासाठी मनापासून आभार...@kalepooja तू कमाल आहेस! तुम्ही ही जाहिरात पाहिली का ?!? नक्की बघा".
दरम्यान, अश्विनी कमला या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'मोलकरीण बाई', 'कट्टी बट्टी', 'सावित्रीज्योती' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत ती पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती.