Join us  

"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:14 AM

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरेने पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीवर प्रतिक्रिया दिली आहे (porche accident, pune)

पुण्यात रविवारी मध्यरात्री पोर्शे गाडी अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. या गाडीचा अल्पवयीन चालक वेदांत अग्रवालने दोन लोकांना उडवले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. अल्पवयीन 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. अशातच या संपूर्ण घटनेवर मराठमोळा अभिनेता चेतन वडनेरेने त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवली आहे.

चेतन वडनेरेने पोस्ट करुन व्यक्त केली प्रतिक्रिया

"माहित नाही का पण मला नाही वाटत याला कठोर शिक्षा होईल. खरंतर झाली पाहिजे. पोलिस आणि न्यायव्यवस्थेबद्दल मला काही बोलायचे नाहीय, नाहीतर याला सोडून मला जेलमध्ये घालतील.." अशी पोस्ट चेतन वडनेरेने लिहिली आहे. चेतनच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पुणेपोर्शे गाडी अपघात प्रकरण

कल्याणीनगर अपघात प्रकरणात  अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने बुधवारी आपला जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बालहक्क न्यायालयाने आता पूर्वीचा निर्णय बदलून नवे आदेश दिले. अपघातावेळी ते 'बाळ' दारू प्यायले होते, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यशस्वी झाले. 

टॅग्स :मराठीमराठी अभिनेतापुणेअपघातपोर्शे