कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी (Aai Tulja Bhavani Serial) मालिका रंजक वळणावर आली आहे. आता मालिकेत सगळ्यात मोठ्या रहस्याचा खुलासा महिषासुरला होणार आहे. महिषासुर मर्दिनी अध्यायातला महत्वाचा टप्पा मालिकेच्या आगामी भागात उलगडणार आहे. भक्त कल्याणासाठी ‘आईराजा’ झालेल्या आई तुळजाभवानीच्या न्यायदानाच्या कथा मालिकेत उलगडत असून आई तुळजाभवानीच्या रोखठोक न्यायाची जी प्रतिमा आहे त्याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो आहे.
आई तुळजाभवानी मालिकेतले नाट्य सध्या अत्यंत रंगतदार वळणावर असून महिषासुर मर्दिनी अध्यायातला महत्वाचा टप्पा मालिकेच्या आगामी भागात उलगडणार आहे. याच बरोबरीने महिषासुराचा तुळजा या स्त्रीचा शोधही समांतर पातळीवर सुरू आहे, हा शोध देवींपाशी येऊन संपणार का याचा उत्कंठावर्धक टप्पा मालिकेत पाहता येईल.
शुक्राचार्य आपल्यापासून काही गोष्टी लपवता आहेत याचा संशय आलेला महिषासुर त्याचा विश्वासू सेनानी आणि मित्र ताम्रासुराला यमुनांचल प्रदेशात तुळजाच्या शोधासाठी पाठवतो. ताम्रासुराचा देवीशी घडणारा सामना त्यातून निर्माण होणारे नाट्य आवर्जून अनुभवण्यासारखे आहे. ताम्रासुराचे खरे रूप देवीला कळल्यावर देवीच्या क्रोधापासून तो वाचणार का? ‘आई तुळजाभवानी’ची खरी ओळख महिषासुराला पटणार का? हा विलक्षण रंजक टप्पा मालिकेत उलगडणार आहे.