'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. या शोमधील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. गेल्या काही वर्षांमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक कलाकारांनी शो सोडला. काहीच दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरेने आता चला हवा येऊ द्यामध्ये झळकतोय. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराने त्याचा लूक बदलला असून "मला आता खलनायक साकारायचा आहे", अशी इच्छा प्रकट केली आहे. कोण आहे का अभिनेता?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या अभिनेत्याने लूक बदलला
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन सर्वांनाच थक्क करुन सोडलंय. तोंडात काडी, हातात बंदूक, वाढलेले केस, डोळ्यात काजळ आणि रागीट हावभाव अशा लूकमध्ये पृथ्वीकने सर्वांचं लक्ष वेधलंय. पृथ्वीकचा हा खतरनाक लूक अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पृथ्वीकला या लूकमध्ये ओळखणं कठीण आहे. पृथ्वीकने हे खास फोटो पोस्ट करुन कॅप्शन लिहिलंय. त्यामुळे सर्वांनी त्याचं कौतुक केलंय.
पृथ्वीकने हा जबरदस्त लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "प्रिय कास्टिंग दिग्दर्शक. मी हे जे फोटो पोस्ट केलेत ते तुम्ही खलनायकी भूमिकेसाठी, नकारात्मक भूमिकेसाठी, विकृत माणूस, सायको किलर, सुपारी घेणारा चोर अशा भूमिकांसाठी लूक टेस्ट म्हणून गृहीत धरावेत." अशा शब्दात पृथ्वीकने ही इच्छा प्रकट केली आहे. अशाप्रकारे भविष्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून सर्वांना हसवणारा पृथ्वीक खलनायकी भूमिकेत दिसला, तर आश्चर्य वाटायला नको. पृथ्वीक सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच विविध सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये अभिनय करताना दिसत आहे.