'सुख म्हणजे नक्की काय असतं' या गाजलेल्या मालिकेत शालिनी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar). दिसायला सुंदर, फिट अशीही तिची वेगळी ओळख आहे. नियमित योग केल्याने ती आजही इतकी छान दिसते. विक्रांत कुलकर्णी यांच्या माधवीने लग्नगाठ बांधली होती. त्यांना १० वर्षांचा क्युट मुलगा आहे. त्याचं नाव रुबेन आहे. माधवी कधीच नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत नाही. यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे का अशीच चर्चा सोशल मीडियावर सुरु असते. मात्र आता या चर्चांवर पहिल्यांदाच माधवीने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत माधवी निमकर म्हणाली, "सेलिब्रिटींबाबतीत लोक खूप जजमेंटल असतात. सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असतात. वैयक्तिक गोष्टीही ते त्यावर दाखवतात. आमचं हे घर, आमच्या या गोष्टी हे सगळं सार्वजनिक करतात. अर्थात हे सगळं दाखवायचं की नाही ही ज्याची त्याची चॉइस आहे. मी तर असेही काही कपल्स जवळून बघितले आहेत ज्यांची एकमेकांबद्दलच चांगली मतं नाहीयेत, एकमेकांचा आदरही नाहीये किंवा मला त्यांच्यातली भांडणंही माहितीयेत असे कपल्स सोशल मीडियावर वेगळाच दिखावा करतात. आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहोत असं दाखवतात. त्यावर बॅकग्राऊंडला रोमँटिक साँग लावतात. कदाचित त्यांना त्यांची ती बाजू झाकायची असेल ही त्यांची इच्छा."
ती पुढे म्हणाली,"पण मला हे आवडत नाही. इन्स्टाग्राम जेव्हापासून सुरु झालं आहे तेव्हापासून मी कधीच माझ्या कुटुंबाचे फोटो त्यावर पोस्ट केले नाहीत. तेव्हाही घटस्फोट झाला नव्हता आणि आजही झालेला नाही. २०१० मध्ये इन्स्टाग्राम आलं तेव्हा मला नवरा म्हणायचा की तू आपले फोटो टाक. पण माझा हा मुद्दा होता की हे साधन आपण फक्त आपल्या प्रोफेशनपुरतंच वापरायचं. इन्स्टाग्राम काळानुसार महत्वाचं आहेच ती गरज आहे. आपण त्यावर अपडेटेड राहिलं पाहिजे. मी कुटुंबाचे फोटो टाकत नाही कारण माझं काही नवीन नवीन लग्न झालेलं नाही. सणाचे किंवा अमुक तमूक फोटो टाकेन असं होत नाही. हे मी सुरुवातीपासूनच टाकत नाही. क्वचित कधीतरी आमच्या दोघांच्या मनात आला तर एखादा फोटो मी टाकलेला आहे. मी आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे काही वाद असतील ते आम्हाला सोशल मीडियावर टाकायला आवडत नाही किंवा त्याचा बाऊ करायलाही आवडत नाही. ते वाद प्रत्येकाच असतातच. त्याचा संबंध जर थेट सोशल मीडियावर लावणार असाल तर हेच सांगते मी सुरुवातीपासूनच फोटो टाकत नाही."