Join us

‘जेडी’ बनणार श्रीकृष्ण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 10:50 IST

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता जेडी मजेठिया यांचे छोट्या पडद्यावर दणक्यात पुनरागमन होत आहे. 'खिडकी' या मालिकेत जेडी मजेठिया भगवान ...

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता जेडी मजेठिया यांचे छोट्या पडद्यावर दणक्यात पुनरागमन होत आहे. 'खिडकी' या मालिकेत जेडी मजेठिया भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा आठ वर्षीय गोपाळच्या (अफान खान) अवतीभोवती फिरणारी आहे. स्पर्धेच्या युगात आपला टिकाव कसा लागणार अशी चिंता गोपाळला सतावू लागली आहे. शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही पातळ्यांवर यश मिळवण्याचा गोपाळ प्रयत्न असतो. मात्र काही केल्या त्याला त्यात यश मिळत नाही. यामुळे तो हताश होऊ नये यासाठी गोपाळची आजी त्याला आध्यात्म आणि देवावर श्रद्धा निर्माण व्हावी अशा गोष्टी सांगत असते. मात्र देवाचे अस्तित्व तपासण्यासाठी आणि आपल्या जीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी गोपाळ एक दिवस उपास करतो आणि एका पायावर उभे राहण्याचा निर्धार करतो. यावेळी गोपाळचा हा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी त्याचे वडील (अभिषेक अवस्थी) एका जादूगराची (जेडी मजेठिया) मदत घेण्याचे ठरवतात. गोपाळचे वडील या जादूगराला काही दिवस देव बनून गोपाळपुढे वावरण्याची विनंती करतात. ठरल्याप्रमाणे जादूगर गोपाळला भेटतो आणि आपण भगवान श्रीकृष्ण असल्याचे सांगतो. हे ऐकून गोपाळ श्रीकृष्णाला म्हणजेच जादूगरला काही दिवस आपल्यासोबतच राहण्याची विनंती करतो. मात्र त्यानंतर काही दिवसांनी हा जादूगर गोपाळच्या आयुष्यात निघून जातो. त्यामुळे गोपाळ उदास होतो आणि त्याचा शोध घेऊ लागतो. बराच शोध घेतल्यानंतर गोपाळला तो जादूगर दिसतो आणि तिथेच सारे पोलखोल होते.