Join us  

दिलीप जोशींपूर्वी Rajpal Yadav ला मिळाली होती जेठालालची भूमिका; 'या' कारणास्तव दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 1:30 PM

Rajpal yadav: दिलीप जोशी यांच्यापूर्वी राजपाल यादवला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, त्याने ही भूमिका नाकारली. एका मुलाखतीत त्यानेच याविषयी खुलासा केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah).  २००८ साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि आज १७-१८ वर्षांपर्यंत लोकप्रियतेमध्ये तो टॉपवर आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी भाभी, बबिता जी अशी कित्येक पात्र तुफान गाजली. यामध्येच सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती जेठालालच्या (Jethalal) भूमिकेला. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) साकारत आहेत. मात्र, त्यांच्यापूर्वी अन्य एका अभिनेत्याला या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती.

अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अभिनयशैलीच्या जोरावर जेठालाल ही भूमिका अजरामर केली आहे. मात्र, या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अन्य एका अभिनेत्याला पसंती दिली होती. परंतु, या अभिनेत्याने ही लोकप्रिय भूमिका नाकारली.

दिलीप जोशी यांच्यापूर्वी अभिनेता राजपाल यादवला (Rajpal Yadav) या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, त्याने ही भूमिका नाकारली. एका मुलाखतीत त्यानेच याविषयी खुलासा केला आहे.

 "नाही..नाही.. जेठालालच्या पात्राला एका उत्तम कलाकाराने न्याय दिला आहे. मी प्रत्येक भूमिकेला एका कलाकाराचचं पात्र मानतो. आपण सगळे जण एका मनोरंजन विश्वात आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की, मला मिळणारी भूमिका ही माझ्यासाठीच असावी. ती भूमिका साकारणं मी माझं भाग्य समजेन. पण, अन्य एका दुसऱ्या कलाकाराने रचलेली किंवा साकारलेली भूमिका मला पुन्हा साकारणं योग्य वाटत नाही", असं राजपाल म्हणाला.

दरम्यान, राजपालच्या या वाक्यानंतर त्याला एका नव्या भूमिकेचा शोध होता हे स्पष्ट होतं. एक अशी भूमिका जी यापूर्वी कोणीही साकारलेली नाही. राजपालच्या नकारानंतर ही भूमिका दिलीप जोशींना मिळाल्याचं सांगण्यात येतं. सध्या दिलीप जोशी त्यांच्या लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांच्या मुलीचं मोठ्या थाटात लग्न पार पडलं आहे.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माराजपाल यादवटेलिव्हिजनटिव्ही कलाकार