Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील बकुळा मावशीचा रॉकींग अंदाज तुम्ही पाहिला का?, जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 13:30 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत बकुळा मावशी मोलकरीण म्हणून दाखवली असली तरी ती कायम राधिकाच्या मदतीला धावून जात असते. 

छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला पसंती मिळाली आहे. या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. राधिका, शनाया आणि गुरूसह आणखी काही पात्र विशेष लक्षवेधी तसंच रसिकांच्या काळजात घर करून आहेत. या विशेष पात्रांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो बकुळा मावशीचा. या मालिकेत बकुळा मावशी मोलकरीण म्हणून दाखवली असली तरी ती कायम राधिकाच्या मदतीला धावून जात असते. 

तिच्यावर ओढवणाऱ्या प्रत्येक अडचणीत संकटमोचक म्हणून बकुळा मावशी धावून जाते. बोलण्यातील विशेष लकब, शनायाला धडा शिकवण्यासाठी आतुर असलेल्या बकुळा मावशी ही व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करून गेली आहे. बकुळा मावशी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव स्वाती बोवलेकर असं आहे. स्वाती बोवलेकर या मूळच्या कोकणच्या. त्यांचं बालपण कोकणच्या मातीत गेलं असल्याने इथली संस्कृती बोवलेकर यांच्या वागण्या-बोलण्यात पाहायला मिळते. अस्सल कोकणी, वाचनाची आवड, बडबड्या आणि दांडगा अनुभव ही स्वाती बोवलेकर यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये. रेल्वेची नोकरी सांभाळत स्वाती बोवलेकर यांनी अभिनयाची आवड जोपासली. 

विविध मराठी हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नाटकातील त्यांचा दांडगा अनुभव स्वाती बोवलेकर यांना या क्षेत्रात स्थिरावून गेला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्या कोकणात स्थायिक झाल्या. मात्र अभिनयाचे वेड त्यांना स्वस्थ बसवत नव्हतं. त्यामुळे कोकणातून ये-जा करत त्यांनी कोडमंत्र, जास्वंद, खरवस यांत भूमिका साकारल्या. कोडमंत्र नाटकात त्यांनी साकारलेली सुमित्राबाई शेलार ही भूमिका रसिकांना भावली. या नाटकाचे प्रयोग यशस्वीरित्या पार पडले. मात्र वयानुसार त्यांनी या नाटकातून एक्झिट घेतली. स्वाती यांची लेक स्वप्नाली बोवलेकर हीसुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात रस घेत आहे.  

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको