मराठी अभिनेताकिरण गायकवाडला (Kiran Gaikwad) 'देवमाणूस' मधील नकारात्मक भूमिकेने ओळख मिळवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात तो लोकप्रिय झाला. किरणची आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची असं त्यानेच एकदा सांगितलं होतं. किरणच्या करिअरमध्ये आईने त्याला किती पाठिंबा दिला याचा किस्सा नुकताच त्याने सांगितला आहे. तसंच निगेटिव्ह भूमिकेमुळे आईला कसा त्रास सहन करावा लागला याचा खुलासा त्याने केला.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत किरण गायकवाड म्हणाला, "माझी आई पुण्यात धुणी भांडीची कामं करायची. अगदी मी 'लागिरं झालं जी' मध्ये काम करत होतो तोपर्यंत करायची. नंतर मीच तिला म्हटलं की आता बंद कर. बरोबर वाटत नाही. तेव्हापासून तिने बंद केलं. मी तिला म्हटलं की माझ्यापरीने जे होईल ते सगळं मी तुझ्या पायाशी आणून ठेवेन. आईने मला खूप पाठिंबा दिला आहे. मला ती सतत फोन करत नाही. मी कामावर गेलोय, काम झालं की घरीच येणार आहे हे तिला माहित असतं. ती फक्त जेवायला थांबू की नको हे विचारण्यासाठी एक फोन करते."
तो पुढे म्हणाला,"आज तिला माझा खूप अभिमान वाटतो. देवमाणूस मध्ये माझी नकारात्मक भूमिका आहे. लोकांना ते आवडायचं. पण काही बायका आईला भेटून मला शिव्या द्यायच्या. असा काय तुमचा मुलगा? असं म्हणायच्या. आईला तेव्हा खूप वाईट वाटायचं. एकदा ती मला सांगताना रडली की,'असली कामं करु नको. मला बायका असं असं बोलतात.' मला याचं आजही खूप वाईट वाटतं. मी आजपर्यंत तिला सेटवर घेऊन गेलेलो नाही. ज्या दिवशी मी सकारात्मक भूमिका करेन आणि माझा पॉझिटिव्ह सीन असेल त्या दिवशी माझी आई सेटवर असेल असं मी ठरवलंय. निगेटिव्ह काम करताना मला तिला घेऊन जायचं नाही. तिचा मला खूप सपोर्ट आहे."
'देवमाणूस' मालिकेचा तिसरा भाग सध्या सुरु आहे. यामध्येही किरण गायकवाड भूमिका साकारत आहे. तसंच काही महिन्यांपूर्वीच किरणने अभिनेत्री वेष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली. वैष्णवी 'देवमाणूस मधला अध्याय' मध्ये दिसली होती.