'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचा १७ वा सीझन काहीच दिवसांपूर्वी सुरु झाला. हा सीझन सुरु होऊन अवघे सात दिवस झाले असतानाच 'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीझनला पहिला करोडपती सापडला आहे. उत्तराखंडचा आदित्य कुमार हा पहिला करोडपती स्पर्धक ठरला आहे. आदित्यने आपल्या शांत, ठाम स्वभाव याशिवाय चटकन उत्तर देण्याच्या क्षमतेमुळे होस्ट अमिताभ बच्चन आणि प्रेक्षक दोघांनाही प्रभावित केले.
'कौन बनेगा करोडपती १७' शोच्या नव्या एपिसोडमध्ये दिसून आलं की, आदित्यने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं असून या सिझनचा पहिला करोडपती होण्याचा मान त्याला मिळाला आहे. आदित्य १ कोटी जिंकल्याने संपूर्ण प्रेक्षकवर्गात उत्सुकता वाढली, कारण आता त्याने सात कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाला सामोरं जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा प्रश्न अत्यंत कठीण असतो आणि चुकीचे उत्तर दिल्यास आदित्यला फक्त ७५ लाख रुपयांवर समाधान मानावं लागेल. तरीदेखील आदित्यने जोखीम घ्यायचं ठरवलं आहे, हे पाहून प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
प्रोमोमध्ये दिसतं की, आदित्यने एक मजेदार आठवणही सांगितली. तो म्हणाला की, कॉलेजच्या काळात एकदा त्याने मित्रांना सांगितलं होतं की KBCची टीम त्यांच्याकडे येणार आहे. मित्रांनी तेव्हा खूप तयारीही केली, पण शेवटी कळलं की, आदित्यने फक्त त्यांची मस्करी केली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे, या वेळी खरंच KBCकडून त्याला फोन आला आणि त्याचा प्रवास इथपर्यंत पोहोचला. अमिताभ बच्चन यांनी आदित्यचे कौतुक करताना त्याच्या आत्मविश्वासाचा उल्लेख केला. प्रेक्षकांनाही आदित्यची साधी, नम्र शैली आवडली. आता आदित्य ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर नीट देणार का, याकडे सर्वांचं लक्ष होतं.