टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय क्विज शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) नेहमीच चर्चेत असतो. या शोच्या हॉट सीटवर बसण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. 'कौन बनेगा करोडपती'चा १७वा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. नुकतंच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दृष्टिहीन IAS अधिकारी आयुषी डबास सहभागी झाल्या होत्या. आयुषी या 'केबीसी १७' मध्ये ५० लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहचल्या होत्या. पण, ५० लाखाच्या प्रश्नानावर त्या अडकल्या. त्यांनी उत्तर येत नसल्यानं खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि २५ लाख रुपये जिंकले.
अमिताभ बच्चन यांनी आयुषी डबास यांना ५० लाख रुपयांसाठी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की, 'कोणत्या रॉक बँडने कोलंबिया अंतराळवीरांच्या स्मरणार्थ 'कॉन्टैक्ट' हे शेवटचं गाणं लिहिलं होतं? जो अल्बम कल्पना चावला यांनी आपल्या मिशनमध्ये सोबत ठेवला होता?'. पण, या प्रश्नाचे उत्तर आयुषी डबासकडे नव्हते. तसेच कोणतीही लाइफलाइन उरलेली नव्हती आणि रिस्क घेण्यास त्या तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या ५० लाख रुपयांसाठीच्या प्रश्नासाठी A. पिंक फ्लॉइड, B. ब्लॅक सब्बाथ, C ग्रीन डे, D. डीप पर्पल हे चार पर्याय दिले होते. याचं अचूक उत्तर आहे "D. डीप पर्पल".
आयुषी जन्मापासूनच दृष्टिहीन असून त्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. आयएएस अधिकारी होण्यापूर्वी आयुषी यांनी १० वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. त्या म्हणाल्या की, "माझा जन्म ही एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हता. जेव्हा माझ्या आई-वडिलांना समजलं की मी दिव्यांग आहे आणि कधीच पाहू शकणार नाही, तेव्हा त्यांनी माझ्या ह्याच कमकुवतपणाला माझी ताकद बनवलं. त्यांनी मला ज्ञानाच्या प्रकाशासारखं उभं केलं, जेणेकरून माझ्या आयुष्यातील अंधार नाहीसा होईल. हे धैर्य मला माझ्या आईकडून मिळालं. तिची इच्छा होती की मी माझ्या आयुष्यात मोठं यश मिळवावं".
दरम्यान, अमिताभ बच्चन २००० मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात.