Join us

​‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये साजरा होणार ‘कारगिल विजय दिवस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:55 IST

२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस मानला जातो. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. ...

२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस मानला जातो. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्यामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची ओढ असलेल्या तीन तरुणांची गोष्ट झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दाखवण्यात येत आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्नं आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट या मालिकेत सांगितली जात आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहुल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, तिकडे घडणाऱ्या गमती जमती, अज्या- शीतलने खोड्या काढत एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या विजयासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिद सैनिकांना मानवंदनाही देण्यात येणार आहे. या मालिकेत हणमंत फौजी यांनी कारगिल युद्धामध्ये लढताना हात गमावला होता. त्यामुळे इंफन्ट्रीकडून कारगिल विजय दिवशी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं जाणार आहे आणि हणमंत त्यांच्यासोबत अजिंक्यलाही घेऊन जाणार आहेत. तेथील ट्रेनिंग सेंटरचं वातावरण पाहून अजिंक्य भारावून जाणार आहे. कारगिलमध्ये शहिद झालेल्या जवानांना यावेळी आदरांजली वाहिली जाणार असून या मालिकेमध्ये हा कारगिल विजय दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.Also Read : ​'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल