Join us

'अंतरपाट'च्या सेटवर कांदाभजी पार्टी! गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 19:11 IST

Antarpath Serial : 'अंतरपाट' या मालिकेतील कलाकारांनाही कांदा भजी खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून चक्क मालिकेतील गौतमी-क्षितिज अर्थात रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनीच किचन हाती घेतले आणि आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली.

पाऊस आणि वाफाळलेला चहा अन् गरमागरम भजी खाण्याची इच्छा होतेच. मग यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अंतरपाट' (Antarpath Serial) या मालिकेतील कलाकारांनाही कांदा भजी खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून चक्क मालिकेतील गौतमी-क्षितिज अर्थात रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनीच किचन हाती घेतले आणि आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली. त्यामुळे साहजिकच कांदाभजी खात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमने पावसाचा आनंद लुटला.

'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदा भजी बनवल्याबद्दल रश्मी अनपट म्हणाली,"पाऊस आणि कांदाभजी हे माझं ठरलेलं समीकरण आहे. पुण्यात असताना पावसाळ्यात सिंहगडावर मी खास कांदाभजी खायला जायचे. पण यंदा शूटमुळे सिंहगडावर जाऊन कांदाभजी खाणं शक्य नाही. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रात्री घरी जाऊन कांदाभजी बनवणंदेखील शक्य होत नाही. त्यामुळे मी माझे दुसरे कुटुंब अर्थात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमसोबत शूटिंगदरम्यानच कांदाभजीचा आस्वाद घेण्याचं ठरवलं". 

रश्मी पुढे म्हणाली,"मी आणि अशोकने कांदाभजी बनवण्याचं ठरवल्यानंतर स्पॉट दादांनी आम्हाला त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणून दिली. मग मी आणि क्षितिजने आमच्या संपूर्ण युनिटसाठी मस्त गरमा गरम कांदाभजी बनवली. सगळ्यांनी एकत्र बसून कांदाभजीचा आस्वाद घेतला. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही दोघांनी बनवलेली कांदा भजी संपूर्ण युनिटला आवडली. खरंतर आम्ही मजा, मस्ती करत कांदाभजी बनवली आणि त्यावर ताव मारला. 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवरची ही पावसाळी मेजवानी मी कधीही विसरू शकत नाही".