कमला फेम अश्विनी कासार झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 13:23 IST
विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेली कमला ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत कमला ही भूमिका अश्विनी कासारने ...
कमला फेम अश्विनी कासार झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत
विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेली कमला ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत कमला ही भूमिका अश्विनी कासारने साकारली होती. अश्विनीची ही पहिलीच मालिका असली तरी प्रेक्षकांनी या मालिकेतील तिची भूमिका डोक्यावर घेतली होती. आज ही मालिका संपून अनेक महिने उलटले असले तरी प्रेक्षक तिला आजही कमला म्हणूनच ओळखतात. हीच प्रेक्षकांची लाडकी अश्विनी कासार छोट्या पडद्यावर परतत आहे. कमला ही मालिका संपल्यानंतर अश्विनी छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. दरम्यानच्या काळात तिने काही नाटकांमध्ये काम केले होते. पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कट्टी बट्टी या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कमला या मालिकेत प्रेक्षकांना तिला नेहमी साड्यांमध्येच पाहायला मिळाले होते. पण कट्टी बट्टी या मालिकेतील तिचा लूक हा कमला या मालिकेतील तिच्या लूकपेक्षा खूप वेगळा असणार आहे. तसेच या मालिकेतील तिची भूमिका देखील पूर्णपणे वेगळी असणार आहे. या मालिकेत अश्विनी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती प्रचंड धमाल मस्ती करताना आपल्याला दिसणार आहे. या नव्या भूमिकेसाठी अश्विनी खूपच उत्सुक आहे. या मालिकेचे कथानक हे मराठवाड्याशी संबंधित असल्याने या मालिकेचे चित्रीकरण हे सध्या अहमदनगर येथेच सुरू आहे आणि या मालिकेचे कलाकार देखील याच परिसरातील आहेत. या मालिकेत अनेक नवोदित कलाकार आहेत. या मालिकेविषयी अश्विनी सांगते, कमला या मालिकेपेक्षा या मालिकेतील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. एक वेगळी आणि एक धमाल भूमिका साकारायला मिळत असल्याने या मालिकेत मी काम करण्याचे ठरवले. या मालिकेचे चित्रीकरण सध्या अहमदनगर येथे सुरू असून तेथील एका गावात आम्ही चित्रीकरण करत आहोत. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. चित्रीकरणाच्या वेळी आम्ही सगळेच खूपच धमाल मस्ती करतो. या मालिकेची कथा ही विनोद लव्हेकर यांची असून त्यांच्यासोबत मला कित्येक दिवसांपासून काम करायचे होते. या मालिकेमुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. या मालिकेचे कथानक हे मराठवाड्यातील असल्याने मालिकेतील संवाद हे त्याच प्रांतातील भाषेप्रमाणे असणार आहेत. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा शिकणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण आता मला हा लहेजा जमू लागला आहे