Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यात जीव रंगला या मालिकेसाठी हार्दिक जोशी घेत आहे या महान पैलवानाचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:00 IST

मातीतल्या कुस्तीतला राणा आता न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे मॅटवरचा कुस्तीचा श्रीगणेशा करणार आहे. मॅटवरचा कुस्त्या कशा खेळाव्यात यासह विविध क्लुप्त्या शिकवण्यासाठी एक महान पैलवान, आदर्श वस्ताद त्याला आता मदत करणार आहेत.

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन जायला सर्वोतोपरी तयार होतोय तर तिकडे कोल्हापुरात राणा घामाने चिंब न्हाऊन निघत आहे. आता तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेमध्ये एक वेगळे वळण येणार आहे. मातीतल्या कुस्तीत 'वज्रकेसरी' झालेला राणा आता मॅटवरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बेमुदत निकाली कुस्तीत राणाने दलवीरला पंचगंगेचे पाणी पाजले. मात्र मातीत पकड मजबूत असणारा राणा आता मॅटवर तितक्याच चपळतेने कुस्ती खेळू शकेल का याची उत्सुकता आता तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या फॅन्सना लागली आहे.

हार्दिक जोशी उर्फ राणा या मालिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. यापूर्वी मातीतल्या कुस्तीतले बारकावे त्याला त्याचा मित्र अतुल पाटील उर्फ भाल्याने शिकवले होते. मात्र अतुल आता पोलीस दलात भरती झाला असून त्याला अकोला येथे प्रशिक्षणासाठी जावे लागले आहे.

मातीतल्या कुस्तीतला राणा आता न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे मॅटवरचा कुस्तीचा श्रीगणेशा करणार आहे. मॅटवरचा कुस्त्या कशा खेळाव्यात यासह विविध क्लुप्त्या शिकवण्यासाठी एक महान पैलवान, आदर्श वस्ताद त्याला आता मदत करणार आहेत. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ३१ पदके मिळवून दिली आहेत. भारत सरकारने 'अर्जुन' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. हार्दिकला मदत करण्यासाठी त्यांना खास कोल्हापूरला आमंत्रित करण्यात आले आहे.

काकासाहेब पवार हे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे संस्थापक असून त्यांनी सध्या भारताला राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पैलवान राहुल आवारे सारख्या कित्येक मल्लाना घडवले आहे. नक्कीच तमाम कुस्तीप्रेमी रसिकांसाठी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत काकासाहेब पवार यांचे आगमन एक गोड धक्का देऊन जाईल यात शंका नाही.

या मालिकेमुळे जनमानसात कुस्तीचा प्रचार होण्यास मदत होत आहे. ज्यांना कुस्ती माहिती नाही असे महानगरात राहणारे सुशिक्षित लोक सुद्धा या मालिकेमुळे कुस्तीकडे आकर्षित होत आहेत. या टीमने वेळोवेळी खरी कुस्ती आणि खऱ्या कुस्तीचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळी सुद्धा काकासाहेब पवार यांच्या रूपाने हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली आहे आणि भविष्यात सुद्धा ते असेच खरे पैलवान समाजासमोर आणणार आहेत. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाहार्दिक जोशी