Join us

जुई गडकरीची नवीन इनिंग, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:41 IST

Jui Gadkari : जुई गडकरीने नुकतेच तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या नवीन सुरुवातीबद्दल सांगितले आहे.

जुई गडकरी (Jui Gadkari ) मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मालिकेत तिने साकारलेल्या विविध भूमिकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'(Tharala Tar Mag)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने साकारलेली साधी, सोज्वळ सायली प्रेक्षकांना खूप भावते. तिचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, जुई गडकरीने नुकतेच तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या नवीन सुरुवातीबद्दल सांगितले आहे.

जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत तिच्या नवीन इनिंगबद्दल सांगितले. ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टर्सचे शिक्षण घेणार आहे. उद्योजकता या विषयात ती पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. तिने पोस्ट शेअर करत सांगितले की, 'नवीन सुरुवात'. तसेच तिने #studentforlife असा हॅशटॅगही वापरला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गृहपाठ करताना दिसते आहे. 

'ठरलं तर मग'बद्दल'ठरलं तर मग' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे आता सायली आणि कल्पना यांच्यातील दुरावा मिटला आहे. दुसरीकडे मधुभाऊंनी सांगितल्यामुळे अर्जुनला सायलीचे आई-बाबा जिवंत असल्याचे समजले आहे. त्यामुळे तो सायलीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच सायलीच तन्वी असल्याचे समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :जुई गडकरी