राज्यसभा सदस्य असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सेल्फी घेण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या चाहत्याला जया बच्चन यांनी जोरात ढकलल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जया बच्चन यांना ट्रोल करण्यात येत आहे. यावर मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने तिचं मत व्यक्त करत तिच्यासोबत घडलेला प्रसंगही सांगितला आहे.
मुग्धा गोडबोलेने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या वाट्याला आलेले चाहत्यांचे दोन प्रसंग शेअर केले आहेत. "जया बच्चन ही फार मोठी व्यक्ती आहे हे सगळ्यात आधी मान्य करून पुढे लिहिते आहे. स्वतःला जया बच्चन एवढी मोठी समजते का वगैरे गैरसमज कृपया नसावा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "काही वर्षांपूर्वी मी माझ्या आईवडिलांना घेऊन जेवायला गेले होते. बाबांचा वाढदिवस होता. मी खास तेवढ्यासाठी मुंबईहून तळेगावला गेले होते, ते मला भेटायला म्हणून त्या दिवशी तिथे आले होते. काही तास आम्ही एकत्र असणार होतो कारण तेवढाच वेळ आम्हाला मिळणार होता. आमच्या मागच्या टेबलवर एक लेकुरवाळं कुटुंब होतं. किती लेकुरवाळं, तर आठ दहा मुलं आणि सगळी मिळून पंचवीस जणं. मी जेवताना सतत ती मुलं माझ्या बाजूला येऊन बसत होती, त्यांचे दादा काकू वडील येऊन हसत हसत फोटो काढत होते. नंतर ते सगळे निघताना त्यांची अशी अपेक्षा होती की मी जेवण सोडून उठून त्यांच्याबरोबर एक फोटो काढावा. मी त्याला नकार दिल्यावर त्यांनी माझ्या भोवती कोंडाळं करून सेल्फी काढला. परवानगी वगैरेचा संबंधच नाही".
मुग्धाने तिच्यासोबत घडलेला आणखी एक प्रसंग सांगितला आहे. "दुसरी घटना. माझ्या नाटकाचा प्रयोग संपला. आणि माझ्या शाळेतल्या माझ्या माने बाई अचानक मला भेटायला आल्या. हातात काठी. कश्याबशा उभ्या होत्या. अर्थात मला खूप आनंद झाला, मी त्यांना नमस्कार केला, त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना उभं राहतानाही आधार लागत होता पण त्या खास मला भेटायला नाटक संपल्यावर थांबल्या होत्या. माझ्या लक्षात आलं की तीन पुरुष बाजूला थांबले होते. त्यातल्या एकाने अत्यंत उर्मट आवाजात, 'ओ द्या की फोटो आम्ही थांबलोय', असं म्हटलं. मी शांतपणे म्हटलं ' दोन मिनिटं थांबा, आले.' यावर त्याहून उर्मटपणे 'आम्ही प्रेक्षक आहे आम्हाला थांबायला नका सांगू, ' असं तो म्हणाला. लाज वाटून माझ्या बाई म्हणाल्या ' काढ त्यांच्याबरोबर फोटो मी निघते आहे. '. बाई गेल्या, मला त्यांना नीट भेटता आलं नाही, त्यांचा नंबर घेता आला नाही याची खंत माझ्या मनात कित्येक वर्ष राहिली आहे. मला काहीच म्हणायचं नाहीये. असंख्य पैकी या दोन घटना", असं म्हणत मुग्धाने प्रत्येक वेळी चूक कलाकाराची नसते हे नजरेस आणून दिलं आहे.