Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थांच्या भूमिकेत आता नवा चेहरा! अक्षय मुदवाडकरांनी सोडली मालिका, प्रेक्षकांच्या भेटीस आले नवे स्वामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:08 IST

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा बदल! प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?

Jai Jai Swami Samarth : छोट्या पडद्यावरील स्वामीभक्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा मार्ग दाखवणारी लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी समर्थ'  गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपल्या शांत आणि संयमी अभिनयाने श्री स्वामी समर्थांची भूमिका जिवंत करणारे अभिनेता अक्षय मुदवाडकर आता या मालिकेत दिसणार नाहीत. त्यांच्या जागी आता एका अनुभवी मराठी अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. 

अक्षय मुदवाडकर यांनी साकारलेले स्वामी समर्थांचे रूप प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. त्यांच्या प्रभावी संवादफेकीमुळे आणि सादरीकरणामुळे ही मालिका घराघरांत पोहोचली. मात्र, प्रदीर्घ काळ ही भूमिका साकारल्यानंतर आता अक्षय मुदवाडकर यांनी या पात्राचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जागी आता प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील गोडसे स्वामी समर्थांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत.

स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधून मालिकेत हा मोठा बदल करण्यात आला आहे. सुनील गोडसे यांची स्वामींच्या भूमिकेतील एन्ट्री असलेला विशेष भाग नुकताच प्रसारित झाला. सुनील गोडसे हे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनुभवी नाव आहेत. ते या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमिकेला कसा न्याय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालिकेतील या अचानक झालेल्या बदलामुळे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अक्षय मुदवाडकर यांनीच ही भूमिका पुढे सुरू ठेवावी, अशी इच्छा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, सुनील गोडसे यांच्या अभिनयाचेही काही प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. नवीन 'स्वामीं'च्या रूपात सुनील गोडसे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात का, हे येणाऱ्या भागांतून स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : New Face for Swami Samarth: Akshay Mudwadkar Replaced!

Web Summary : A new actor, Sunil Godse, replaces Akshay Mudwadkar as Swami Samarth in 'Jai Jai Swami Samarth'. The change, coinciding with Swami's birthdate, sparks mixed reactions from viewers accustomed to Akshay's portrayal.
टॅग्स :श्री स्वामी समर्थमराठी अभिनेताटिव्ही कलाकार