ऋचा केळकर (Rucha Kelkar) मालिकाविश्वातील अभिनेत्री आहे. सुबोध भावे आणि शिवानी सोनारच्या 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत ती पाहायला मिळाली होती. ऋचा केळकर सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने इंस्टाग्रामवर बाबांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने बाबांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
ऋचा केळकरने वडिलांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिले आहे. तिने लिहिले की, ''बाबाची साठी. दोन दिवस ही गोष्ट सिंक इन व्हायला गेले की वडील साठ वर्षाचे झालेत. सगळ्या प्रेमळ माणसांच्या गोतावळ्यात सेलिब्रेशन अगदी जोरदार झालं. बाबाला साठीला लक्षात राहील असं काय गिफ्ट द्यावं याचा विचार करत होते. स्वतःच्या जिवाचे कसलेच चोचले न पुरवणाऱ्या माणसाला वस्तू रूपी काय भेट देणार?? मग असा विचार केला की अनुभव रुपी भेट दिली तर…मी दहावीत असताना एक बकेट लिस्ट तयार केली होती त्यात बाबाच्या साठीला मर्सिडिज गिफ्ट करीन असं लिहिलं होतं.''
तिने पुढे लिहिले की,''आता विचार केला तरी हसू येतंय…वडील ६० होत असताना आपण फक्त २९ वर्षाचे असणार आहोत आपण अत्यंत अस्थिर क्षेत्राची वाट निवडणार आहोत आणि मर्सिडिज गाडीचा लोगोचं फक्त आपल्या खिशाला परवडणार आहे या कसल्याच गोष्टीची जाणीव त्या ऋचाला नव्हती. मग डोक्यात विचार आला की त्याची लाडकी गाडी विकत घ्यायला जमलं नाही तरी काही काळापुरता त्यात बसण्याचा अनुभव तर विकत घेऊच शकतो. सगळ्या गोष्टींची जुळवा जुळव करून अखेर गाडी घरापासून पार्टीच्या व्हेन्यूपर्यंत आम्हाला न्यायला आली. वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून गेला… त्यांची वेडी मुलगी त्याच्यासाठी काहीही करू शकते हे समजल्यानंतर त्याचे बदललेले डोळे मी आयुष्यभर विसरणार नाही! लव्ह यू बाबुडी. तळटीप: मी नेसलेल्या साडीवर बाबा ला आवडणाऱ्या सगळ्या जुन्या नायिकांचे फोटोज प्रिंट करून घेतलेत (मधुबाला, वहिदा रहेमान, नर्गिस, मुमताज, स्मिता पाटील).''