Join us

​आरोह वेलणकर आणि अश्विनी कासार प्रेम हे मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 12:07 IST

प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो, प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो. प्रेमात आखंड बुडणे, ...

प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो, प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो. प्रेमात आखंड बुडणे, एखाद्या व्यक्तीसाठी  प्रेमात सर्वस्व अर्पण करणे ही भावनाच वेगळी आहे. अशाच काहीशा विचारांनी बहरलेली समर्पण ही गोष्ट प्रेम हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भागात प्रेक्षकांना दिव्येश आणि रमाची कथा पाहायला मिळणार आहे. आरोह वेलणकर यात दिव्येशची भूमिका साकारणार आहे. आरोहने रेगे या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. समर्पणमध्ये दिव्येश हा अतिशय श्रीमंत घरातील मुलगा असून अनेक वर्षं अमेरिकेत राहिला आहे असे दाखवण्यात येणार आहे. अतिशय सुस्वभावी आणि सुशिक्षत असा दिव्येश सगळ्यांना जीव लावणारा असा मुलगा आहे तर अश्विनी कासार रमाच्या भूमिकेत दिसणार आहे. अश्विनीने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती. रमा ही मध्यमवर्गीय घरातील पण जबाबदारीची जाणीव असलेली मुलगी आहे. वडील गेल्यानंतरही खंबीरपणे घर सांभाळणारी रमा अतिशय स्वावलंबी आणि निरागस मुलगी आहे. समर्पणमध्ये यतीन कारेकरदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ते दिव्येशच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिव्येशचे वडील हे मोठे बिल्डर असून त्यांना रिमाचे घर हवे आहे. वाट्टेल ते मार्ग वापरून ते रिमा आणि तिच्या आईला तिथून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दिव्येशसुद्धा सुरुवातीला पैशांचा विचार करून वडिलांना मदत करतो. पण हळूहळू निरागस रमाच्या तो प्रेमात पडतो. रमालाही दिव्येश आवडू लागतो. अशी ही आगळीवेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना समर्पणमध्ये पाहायला मिळणार आहे.