Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indian Idol 12: शत्रुघ्न सिन्हा यांनी या कारणामुळे नाकारला होता 'शोले', खुद्द त्यांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:01 IST

'इंडियन आयडॉल १२'च्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा हजेरी लावणार आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉल सीझन १२ मधले युवा, प्रतिभावान गायक आपल्या सुरेल, सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात येणार्‍या मान्यवरांमुळे या शोला चारचाँद लागतात. या वीकेंडला बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्याची पत्नी पूनम सिन्हा हजेरी लावणार आहेत. आगामी भाग हा ‘शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा’ विशेष भाग असणार आहे. सर्व स्पर्धक हिमेश रेशमिया, सोनू कक्कर आणि अन्नू मलिक या परीक्षकांसमोर खुद्ध शत्रुघ्न सिन्हाच्या उपस्थितीत त्याची गाजलेली गाणी सादर करताना दिसतील. मनमोकळ्या गप्पा-गोष्टींच्या ओघात, परीक्षक हिमेश रेशमिया या बॉलीवूड स्टारच्या प्रवासातील काही मजेदार किस्से उघड करताना दिसेल.

 ‘शोले’ चित्रपट न स्वीकारण्यामागचे खरे कारण काय होते या हिमेशच्या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “याला तुम्ही ‘मानवी चूक’ म्हणू शकता. रमेश सिप्पी साहेब भव्य चित्रपट बनवत असत आणि त्यांनी शोले बनवला तेव्हा तो खूपच गाजला आणि जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, भारतरत्न व ऑस्कर विजेता स्व. सत्यजीत यांनी देखील यांना देखील हा चित्रपट आवडला आणि त्यांनी ‘शोले’चे कौतुक केले.” 

ते पुढे म्हणाले की, “त्या काळात मी अशा काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये गुंतलेला होतो, ज्यात दोन नायक होते. कसे कोण जाणे, तुम्ही याला मानवी चूक म्हणा किंवा कदाचित माझ्या तारखांची समस्या असेल, पण मी शोले स्वीकारला नाही खरा. मला त्याचे वाईट वाटते आणि त्याच वेळी बरेही वाटते कारण शोले मुळेच माझा प्रिय मित्र, राष्ट्रीय आयकॉन अमिताभ बच्चन याला मोठा ब्रेक मिळाला.”

 बर्‍याचदा तारखांच्या समस्येमुळे चित्रपट नाकारावा लागतो. अमिताभ बच्चनला कालीचरण करायचा होता, पण त्याला काही कारणाने नाही जमले. या गोष्टी स्वाभाविक आहेत. अगदी राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल यांनीही या ना त्या कारणाने काही चित्रपट नाकारले असतील. याला इलाज नाही, असे यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाइंडियन आयडॉल