Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indian Idol 12: फायनलिस्ट सायली कांबळेला लागली लॉटरी, शो संपताच मिळाला मोठा ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:35 IST

इंडियन आयडॉल १२ शोमधील स्पर्धक सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झाली आहे.

इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झाली आहे. सायलीचे इंडियन आयडॉल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले  आहे.

याबाबत सायली कांबळे म्हणते, “मला विश्वासच बसत नाही की माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. इंडियन आयडॉलमध्ये जाण्याचे कारणच होते, लोकांनी मला ओळखावे आणि माझे संगीत क्षेत्रातील करीयर सुरू व्हावे. इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले झाल्याझाल्या हातात काम मिळणे, हे भाग्याचे आहे. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.”

जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे यांनी हे रोमँटिक गाणे गायले आहे. हे गाणे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांंच्यावर चित्रीत होणार आहे.

फिल्ममेकर जो राजन म्हणाले, सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडॉलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिला आहे. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी सिनेमासाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतो आहे.

संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, आमचे दिग्दर्शक जो राजन यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिद्ध करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय, असे मला वाटते.

टॅग्स :अवधुत गुप्ते गायत्री दातार