स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिका (Tharala Tar Mag) अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विलास मर्डर केसच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि विलासचा खून साक्षीनेच केला हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन, सायली आणि चैतन्य जीवतोड मेहनत घेत आहेत. तर तिकडे दामिनी देखमुख देखिल साक्षीच्या बचावासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतेय. दररोज केसचे नवनवे धागेधोरे सापडत असल्यामुळे हा खून खटला अधिकाधिक रंजक होत चालला आहे.
मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु आहे. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत आहेत. कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं जातंय. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण टीमसाठी हा नवा अनुभव आहे.
कलाकारही प्रत्येक सीनमध्ये जीव ओतून काम करत आहेत. आता उत्सुकता आहे ती अंतिम निकालाची. विजय नेमका कुणाचा होणार? कायद्याच्या कचाट्यात कोण अडकणार? याचं उत्तर ३० जुलैला मिळणार आहे.