Join us

'श्रीमद् रामायण' मालिकेत माता सीतेच्या अढळ विश्वासाचे घडले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 18:42 IST

Shrimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील श्रीराम कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ (Shrimad Ramayana) मालिकेतील श्रीराम कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. सध्या सुरू असलेल्या अत्यंत आकर्षक अशा कथानकात दाखवले आहे की, हनुमान सीतेचा शोध घेत घेत अशोक वाटिकेत जाऊन पोहोचतो आणि तेथे एका उपवनात त्याला सीता मातेचे दर्शन होते. सीतेभोवती राक्षसींचा पहारा असल्याचे त्याला दिसते. स्वतःचा परिचय तो श्रीरामाचा दूत असा करून देतो आणि श्रीरामाने दिलेली अंगठी सीतेला देतो. ती अंगठी पाहून सीतेच्या हृदयात आशा पल्लवित होते की, आपल्यावर प्रेम करणारा आपला पती नक्कीच आपली इथून सुटका करेल. हनुमान अशोक वाटिकेतून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या जाणीव होते की, आपल्याला खूप भूक लागली आहे. तो अन्नाच्या शोधात फिरत असताना सुरक्षा सैनिकांच्या नजरेस पडतो. तो एकापाठोपाठ एक प्रत्येक सैनिकाचा समाचार घेतो. या गोंधळाची वार्ता रावणाचा लहान मुलगा अक्षय कुमार याच्यापर्यंत पोहोचते. त्यानंतर अक्षय कुमार आणि हनुमान यांच्यात चकमक होते आणि त्यात हनुमान अक्षय कुमारचा वध करतो. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून क्रोधित झालेला रावणाचा मोठा मुलगा मेघनाद ब्रह्मास्त्राचा वापर करून हनुमानाला बंदी बनवतो आणि त्याला शिक्षा सुनावण्यासाठी लंकाधीश रावणाच्या समोर उभा करतो.

 सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री प्राची बन्सल म्हणाली की, “सीता मातेची भूमिका करून मी विश्वासाची ताकद जाणली आहे. विशेषतः अशोक वाटिकेत हनुमानाशी तिची भेट झाल्यानंतर. अनेक त्रासांना तोंड देत असूनही रामाचे अढळ प्रेम आणि वचनबद्धता यावरील तिचा विश्वास डगमगत नाही. राम ज्या दृढतेने तिचा शोध घेत आहेत त्यातून ती शक्ती प्राप्त करत आहे आणि आपले रामाशी असलेले नाते या दुःखांच्या पलीकडचे आहे हा दिलासा स्वतःला देत आहे.”  मालिकेतील हा महत्त्वाचा घटनाक्रम प्रेक्षकांना नक्कीच आकर्षक वाटेल. यात हनुमानाचा पराक्रम,  निष्ठा आणि बुद्धिमत्ता यांचे दर्शन घडते. सीतेचा शोध घेऊन श्रीरामाचा संदेश तो सीतेला देतो तसेच लंकेचा अधिपती रावण याच्याशी देखील त्याचा प्रथमच आमना-सामना होतो. 

टॅग्स :रामायण