Join us

'उदे गं अंबे' मालिकेत दत्त जयंतीच्या दिवशी यल्लमाला दर्शन होणार साक्षात दत्तगुरुंचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:04 IST

Ude Ga Ambe Serial : 'उदे गं अंबे' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपिठांची महती सांगणाऱ्या या मालिकेत सध्या रेणुकादेवीच्या अवतार कार्याची गोष्ट पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाहच्या 'उदे गं अंबे' मालिकेला (Ude Ga Ambe Serial) प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपिठांची महती सांगणाऱ्या या मालिकेत सध्या रेणुकादेवीच्या अवतार कार्याची गोष्ट पाहायला मिळत आहे. रेणुकामातेच्या जन्माची गोष्ट, बालवयात तिने दाखवेलेले दैवी चमत्कार आणि मालिकेत सध्या सुरु असलेली यल्लमा आणि रेणुका देवीच्या मैत्रीची कथाही प्रेक्षक पसंतीस उतरत आहे.

दत्तजयंतीच्या शुभदिनी मालिकेत यलम्माला साक्षात दत्तगुरुंचं दर्शन होणार आहे. यल्लमाला गेल्या काही दिवसांपासून अगम्य स्वप्न पडत आहे. या स्वप्नात यल्लमाला रेणुकेचं मस्तक एका मुखवट्यात रुपांतरित होताना दिसत आहे. तिच्या बालमनाला वाटतं की रेणुकेचं मस्तक मुखवटा बनणं याचा अर्थ तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना. यल्लमा पाड्यावरच्या शिवलिंगापाशी जाऊन महादेवांना मनातला प्रश्न विचारते. महादेव एका भिल्लाच्या रुपात भेटून दत्त जयंतीला एक गोसावी येऊन तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला देईल असं यल्लमाला सांगतात. हा गोसावी म्हणजे साक्षात दत्तगुरु. यल्लमाला स्वप्नात दिसणारा माहुरगडावरील मुखवटा हा भविष्यात निर्माण होणाऱ्या शक्तिपीठाची नांदी असल्याचं दत्तगुरु सांगणार आहेत.

या मुखवट्यामागे नेमकी कोणती गोष्ट दडलेली आहे. महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी मुळ जागृत पीठ मानल्या जाणाऱ्या माहुरगडाची निर्मिती कशी झाली? रेणुका आणि यल्लमा यांचं नेमकं नातं काय? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं उदे गं अंबे मालिकेच्या यापुढील भागांमधून मिळणार आहेत.