'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlarla) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारांनीदेखील रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेची लोकप्रियता आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट अभिराम उर्फ एजेची भूमिका साकारतो आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज 'लीला' च्या भूमिकेत दिसते आहे. एजे-लीलाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. आता मालिकेत एजे आणि लीलामध्ये प्रेम फुलताना दिसणार आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत रेवतीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. लीलाला जाणवतंय की एजे तिच्या प्रेमात आहे. रेवती आणि यशच्या हळद, मेहंदी, संगीत आणि इतर लग्नाच्या विधींमध्ये एजेची नजर लीलावरून हटतच नाहीये. हे पाहून लीलाला खात्री पटते की एजेचं तिच्यावर प्रेम आहे. खात्री पटल्यावर ती एजे समोर एक अट ठेवते की त्याला स्वतःच्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागेल आणि ती कबुली लीलाला एजेकडून ऐकायची आहे.
दरम्यान, दुर्गा विक्रांतला सांगते की शेवटच्या क्षणी यशची जागा घेऊन त्याने रेवतीशी लग्न करावं. या सर्वात लीला, एजेला गिटार आणून देते जी तो अंतरासाठी वाजवायचा. एजे पुन्हा एकदा गिटार वाजवायची इच्छा दर्शवतो. अंतराच्या निधनानंतर अभिराम पहिल्यांदाच गिटार वाजवणार आहे आणि ते ही लीलासाठी. लीला आणि एजेचे हे गोड क्षण आणि दुर्गाचा कट कसा हाणून पाडणार लीला आणि एजे ? हे पाहणे कमालीचे ठरेल.