Join us
Daily Top 2Weekly Top 5

तासभर तरी मोबाईलपासून दूर राहते, अभिनेत्रीने सांगितला तिचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 19:52 IST

सृष्टीलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बाहेर पडताना तिने अंगी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या. या सवयी इतर लोकांनीही आपल्या दैनंदिन जीवनात लावून घ्याव्यात असे आवाहन तिने केले आहे.

‘झी टीव्ही’वरील ‘हमारीवाली गुड न्यूज’ या मालिकेने अगदी प्रारंभापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. रेणुकाचा मृत्यू आणि मीराचे मुकुंदशी लग्न झाल्यावर मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या अनेक कलाटण्यांमुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले आहे. मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांना आपल्याशी खिळवून ठेवले असून प्रेक्षकांना घरातच राहण्यास आणि त्याद्वारे सुरक्षित राहण्यास या कलाकारांनी भाग पाडले आहे. मालिकेतील सून नाव्या (सृष्टी जैन) हिने देशभरातील प्रेक्षकांना या फिट राहण्यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

 सृष्टीलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  त्यातून बाहेर पडताना तिने अंगी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या. या सवयी इतर लोकांनीही आपल्या दैनंदिन जीवनात लावून घ्याव्यात असे आवाहन तिने केले आहे. सृष्टी जैन म्हणाली, “कोविड-19 विषाणूच्या साथीने प्रत्येकाला आपल्या कवेत घेतले असून त्यामुळे माझ्यासह अनेकजण चिंताग्रस्त बनले आहेत. पण मी कोणत्याही परिस्थितीत आशावादी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते. 

किंबहुना मी माझ्या अंगी अनेक अशा सवयी लावल्या आहेत. नित्यनियमाने त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. ज्या माझ्या मनावरील ताण दूर करून माझं मन शांत करतात. मी माझ्या दिवसाची सुरुवात इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे करते. सकाळी उठल्यावर लगेच मी ध्यानधारणा करते. त्यानंतर साधारण एक तासभर मी मोबाईल किंवा अन्य कोणत्याही गॅजेटपासून स्वत:ला दूरच ठेवते. 

सकाळी कुटुंबियांसमवेत नाष्टा केल्यानंतरच मी मोबाईल फोन हातात घेते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर माझं मन तणावविरहित राहतं. तसंच जेव्हा मी घरी असते किंवा मला मोकळा वेळ मिळतो, किंवा मी एखाद्या तणावपूर्ण दिवसानंतर घरी येते, तेव्हा मी माझ्या कुटुंबियांबरोबर एकत्र बसते, कधी माझ्या बहिणीशी गप्पा मारते. मी चालायलाही जाते. या सगळ्या गोष्टीमुळे माझं मन नेहमी आशावादी आणि सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यामुळे इतर लोकांनीही या सवयी अंगी लावून घ्याव्यात, असं मला वाटतं.”