'लाखात एक आमचा दादा' ('Lakhat Ek Aamcha Dada' Serial) ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सूर्यकांत उर्फ दादा आणि त्याच्या चार बहिणींच्या प्रेमकथेवर आधारित आहे, जिथे तो आपल्या बहिणींना चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबात लग्न लावण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो. सध्या ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान या मालिकेत 'राजश्री' म्हणजेच 'राजू' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.
ईशा संजयने 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील फोटो शेअर करत लिहिले की, ''राजश्री जगताप. माझी पहिली ओळख. माझी कॅमेराच्या जगातली पहिली मैत्रीण. आणि पहिलं आयुष्यभर विशेष राहतं. कोणी मला आता विचारलं राजश्री कशी होती गं? मी म्हणेन, साधेपणातलं सौंदर्य म्हणजे राजू. निःस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम, संयम, कष्ट करण्याची अमाप ताकद आणि बेधडकपणा मला तिने शिकवला. ''
तिने पुढे म्हटलं की, ''खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी लिहू देत नाहीये… कृष्णामातेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, आठवणींची ओंजळ भरून, कमाल अनुभव डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघाले आहे. असंच प्रेम असू दे, नवीन मैत्रिणीला घेऊन पुन्हा येईन भेटायला लवकरच……''