Join us
Daily Top 2Weekly Top 5

'घर भाडं भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते…'; 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याने सांगितल्या कटू आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 09:09 IST

Ajinkya Raut : अजिंक्य राऊत लवकरच अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. काही दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) याने साकारली होती. या भूमिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान आता अजिंक्यने एका मुलाखतीत त्याच्या वाईट काळाबद्दल सांगितले आहे.

अजिंक्य राऊतने विठुमाऊली मालिकेत काम केले आहे. या मालिकेत काम करायला मिळाल्यामुळे तो स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पण या मालिकेनंतर एक वेळ अशी आली की त्याला त्याच त्याच पाठडीतल्या भूमिका मिळू लागल्या. त्याला अशा भूमिका स्वीकारायच्या नव्हत्या. याबद्दल तो म्हणाला की, पौराणिक भूमिका निभावणे खूप कठीण असते आणि त्यानंतर इतर भूमिका मिळवणे त्याहूनही कठीण काम असते. मला अशा भूमिकेत अडकून राहायचे नव्हते. अशा भूमिकेच्या पलीकडे जाऊन मला एक अभिनेता म्हणून ओळख मिळवायची होती. त्यामुळे पौराणिक मालिकेसाठी विचारणा झाली तर मी त्या मालिकांना नकार दिला होता. या मालिकेतील भूमिकेमुळे माझ्या वागण्या बोलण्यात सुद्धा तसाच फरक जाणवायला लागला होता. या भूमिकेमुळे अतिशय शिस्तीत बोलणं आणि शिस्तीत वागणं माझ्या अंगवळणी पडू लागलं होतं. तेव्हा मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. माझ्या दिसण्यात बदल करू लागलो. दाढी वाढवली. सुदैवाने लोकांनी मला या रुपात स्वीकारलं. पण मधल्या काळात म्हणावी तशी भूमिका मिळत नसल्याने माझ्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलं.

अजिंक्य पुढे म्हणाला की, एक वेळ अशी आली की मी माझ्या घराचं भाडं सुद्धा देऊ शकत नव्हतो. लॉकडाऊनमध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मी वाट बघत होतो कारण कधी ना कधी तरी मला तशी भूमिका साकारण्याची संधी मिळेल या आशेवर मी होतो. त्यानंतर माझ्याकडे मन उडू उडू झालं ही मालिका आली. या मालिकेतील भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मी अजूनही माझं व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी प्रयत्न करतो आहे.अजिंक्य राऊत लवकरच अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तो जान्हवी तांबट सोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे.