विकास मानकता सांगतोय गुलाम या मालिकेतील वीरपेक्षा मी खूपच वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 11:48 IST
विकास मानकताने लेफ्ट राईट लेफ्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेचे कौतुक सगळ्यांनीच केले होते. या मालिकेमुळे ...
विकास मानकता सांगतोय गुलाम या मालिकेतील वीरपेक्षा मी खूपच वेगळा
विकास मानकताने लेफ्ट राईट लेफ्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेचे कौतुक सगळ्यांनीच केले होते. या मालिकेमुळे विकास प्रकाशझोतात आला. त्यानंतर मैं ना भुलूंगी या मालिकेत तो झळकला. आता दोन वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर परतला आहे. तो गुलाम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तो वीर ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो एका निर्दयी आणि कठोर स्वाभावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण खऱ्या जीवनात या भूमिकेपेक्षा तो खूप वेगळा असल्याचे सांगतो. विकास सांगतो, मी मालिकेत अतिशय निर्दयी असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच स्त्रियांना अतिशय तुच्छ वागवतो असे प्रेक्षकांना पाहायला मिळते. पण माझ्या खऱ्या आयुष्यात स्त्रियांचा खूप आदर करतो. मी स्त्रीहक्कवादी आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील लोक आवडीने पाहातात. या मालिकेत महिलांना मिळणारी असमान वागणूक आणि त्यांना गुलामासारखे वागवण्यात येते यावर भाष्य करण्यात आले आहे. आपल्या देशातील ग्रामीण भागत तर अशाप्रकारच्या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. शहरी भागातील लोकांपर्यंत अनेकवेळा या गोष्टी पोहोचतदेखील नाहीत. या मालिकेद्वारे याच सगळ्या गोष्टी समाजासमोर आणण्याचा आणि काय चुकीचे आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे पाहिल्यावर काय बरोबर आणि काय चुकीचे याची निवड लोकांनाच करायला आहे. मालिकेत मी खलनायकाच्या भूमिकेत असलो तरी मी माझ्या खऱ्या आयुष्यात यापेक्षा खूप वेगळा आहे. मी नेहमीच महिलांना सन्मान देतो आणि नेहमीच देत राहीन. माझ्या बहिणींच्या प्रत्येक निर्णयातदेखील मी त्यांना नेहमीच पाठिंबा देतो.