Isha Malviya Video : अभिनेत्री ईशा मालवीय हे हिंदी कलाविश्वातील चर्चेत असणारं नाव आहे. 'उडारियां' या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ईशा बिग बॉस १७ च्या पर्वातही झळकली होती. हा शो तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. सध्या सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे ही अभिनेत्री कौतुकास पात्र ठरली आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या वडिलांना खास सरप्राईज देत त्यांचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.
सध्या चाहत्यांमध्ये ईशा मालवीयाच्याच नावाची चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्रीने तिच्या बाबांसाठी महागडी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर याचा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत तिने माहिती दिली आहे. ईशाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय,"बाबा... तुम्ही आजवर माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आता तुमच्या इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे...", असं भावुक करणारं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. वयाच्या २१ वर्षी अभिनेत्रीने स्वबळावर वडिलांसाठी 'Thar Roxx' ही गाडी खरेदी केली आहे. तिच्या या कृत्याचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत जवळपास १२.९९ लाख ते २३.०९ इतकी आहे.
दरम्यान, ईशा मालवीयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर "तुझा खूप खूप अभिमान वाटतोय...",अशा कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.