Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षरा बहू दिसणार नताशाच्या भूमिकेत, अभिनेत्री हिना खान म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:41 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिनाची ‘षडयंत्र’ नावाची नवी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिनाची ‘षडयंत्र’ नावाची नवी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यात अनेक रहस्य उलगडणार आहेत, विश्वास घात करणाऱ्यांचा पर्दाफाश होणार आहे. सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये हिनासोबत कुणाल कपूर, चंदन रॉय सान्याल मुख्य भूमिकेत आहे.

यात रोहन तिवारी आणि नताशा मल्होत्रा तिवारी या विवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात येणार आहे. नताशा ही एका बांधकाम कंपनीची वारस असते पण व्यवसायातील कटकारस्थानांपासून दर एक समाधानी आयुष्य जगत असते. तेव्हाच एका धक्कादायक खुनामुळे नताशाचे आयुष्य बदलून जाते आणि मोहन खन्ना नावाचा अन्वेषण पोलीस अधिकारी खुनाचे रहस्य सोडवण्यासाठी येतो. ही मर्डर मिस्टरी 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

दिग्दर्शक गणेश यादव यांच्या मते, ‘षडयंत्र’ पारंपरिक अगाथा ख्रिस्तीच्या गुढकथांसारखीच आहे पण या कथेला अनेक पदर आहेत. ते सांगतात, "रंगभूमीवर मानसशास्त्रीय थरारनाट्यांची दीर्घ परंपरा आहे आणि स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, डेथ ऑफ अ सेल्समन, गॅसलाइट आणि ब्रोकन इमेजेस यांसारखी नाटके अनेकांना माहित आहेत. 'षडयंत्र' याच प्रकाराचा आधुनिक आविष्कार आहे आणि प्रमुख व्यक्तिरेखेच्या मनाचे प्रतिबिंब यातून आपल्याला दिसते. झी थिएटर टीम तसेच हिना खान, कुणाल रॉय कपूर व चंदन रॉय सान्याल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच समाधान देणारा होता आणि प्रेक्षक ‘षडयंत्र’ला कसा प्रतिसाद देतात हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे.'

नताशाची भूमिका करणारी हिना खान सांगते, " मी नताशाची भूमिका करत आहे. ही व्यक्तिरेखा खूपच भाबडी, विश्वास टाकणारी व उदार आहे पण एका दु:खद घटनेमुळे तिला तिच्या आयुष्याकडे व नात्यांकडे अधिक बारकाईने बघणे भाग पडते आणि मग स्वत:चा बचाव करण्याची तिच्यातील प्रेरणा उफाळून येते. ही व्यक्तिरेखा साकारताना आणि या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना मला खूप आनंद मिळाला, कारण, मला थिएटर करण्याची इच्छा नेहमीच होती. या टेलिप्लेने मला रंगभूमीचा भाग होण्याची संधी दिली आणि भविष्यकाळात असे आणखी टेलिप्ले करता येतील अशी आशा मला वाटते." 

टॅग्स :हिना खान