टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. यामध्ये ती पती रॉकी जैस्वालसोबत सहभागी झाली आहे. अनेक टीव्हीवरील लोकप्रिय सेलिब्रिटी आपल्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरसोबत या शोमध्ये आले आहेत. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे हे सर्वांनाच माहित आहे. दरम्यान कॅन्सर झाल्याचं जाहीर केल्यानंतर तिला काम मिळणं बंद झालं होतं. त्यानंतर हा तिचा पहिलाच रिएलिटी शो आहे ज्याची तिला ऑफर मिळाली. याविषयी तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
हिना खानला कॅन्सर झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील अनेकांनी तिला मानसिक आधार दिला. मात्र आता ती काम करु शकत नाही असं समजून अनेकांनी तिला काम देणंच बंद केलं होतं. पीटीआयशी बोलताना हिना म्हणाली, "आयुष्यात मधल्या काळात जे काही घडलं त्यानंतर हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मला काम करायचं आहे. कोणीही मला सरळ तोंडावर हे सांगितलं नाही की 'तू अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाहीस'. पण मलाही कळतंय की लोकांना संकोच वाटतोय यामागे त्यांची कारणं आहेत."
ती पुढे म्हणाली, "हरकत नाही. मी ही परंपरा मोडून काढावी लागेल. कोणी मला काम देणार नाही मी समजूच शकते. मी जर त्यांच्या जागी असते तर मीही हजार वेळा विचार केला असता. पण मी हे सांगू इच्छिते की मी ऑडिशन्ससाठी तयार आहे. मी थांबलेच कधी होते? पण गेल्या एक वर्षात कोमीही मला कोणत्याही कारणाने बोलवलंच नाही. मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे, कृपया मला संपर्क करा."
हिना खान शेवटची 'कसौटी जिंदगी की २'मध्ये कोमोलिकाची भूमिका करताना दिसली. तसंच ती 'खतरों के खिलाडी सीझन ८', 'बिग बॉस ११' मध्येही होती. आता 'पती पत्नी और पंगा'मध्ये काम करताना तिला खूप आनंद होत आहे. हिना काही महिन्यांपूर्वीच रॉकी जैस्वालसोबत लग्नबंधनात अडकली. दोघंही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. हिनाच्या आजारपणात रॉकीने तिची खूप काळजी घेतली होती. याची झलक हिनाने वेळोवेळी सोशल मीडियावर दाखवली होती.