छोट्या पडद्यावर येण्याचा तू विचार कसा केलास?
मी यापूर्वी अनेक कार्यक्रमात पाहुणा म्हणून आलेलो आहे. मला कॉमेडी कार्यक्रमात जायला तर खूप आवडते. ज्यावेळी मला मझाक मझाक में या कार्यक्रमाविषयी विचारण्यात आले, त्यावेळी मी लगेचच होकार दिला. मला स्वतःला कॉमेडी कार्यक्रम पाहायला खूप आवडतात. आम्ही मॅच खेळून झाल्यावर तणाव दूर व्हावा यासाठी कॉमेडी कार्यक्रम पाहातो. तसेच पूर्वी आजसारखे स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम नव्हते, त्यावेळी मी स्टँडअप कॉमेडीयनच्या परफॉर्मन्सची सीडी विकत घेऊन ती पाहात असे.
तू स्वतः किती मजा-मस्ती करतोस?
माझ्यामते आपल्याला आयुष्य हे एकदाच मिळते, ते आयुष्य हसत जगावे. स्वतः खूप हसावे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही खूप हसवावे. आम्ही मॅचच्या टूरला तर खूप मजा-मस्ती करत असतो. विराट हा खूप चांगला अभिनेता आहे, तो लोकांची नक्कल करून आम्हाला दाखवतो, शिखर धवनही विविध किस्से सांगून आम्हाला हसवतो. आम्ही टूरला जातना सोबत एक पिचकारी घेऊन जातो. विमानात जो झोपेल त्याची खेैर नसते. आम्ही त्याच्या चेहऱ्यावर पिचकारीने पाणी टाकतो, कोणी घोरत असेल तर त्याच्या डोळ्याला चष्मा लावतो. मी बाहेर जितकी मस्ती करतो, त्याच्या दुप्पट मी घर करतो. माझ्या बायकोचे हिंदी चांगले नाहीये. तिला पंजाबी तर अजिबातच येत नाही, या गोष्टीवरून तर तिला सतवण्याची एकही संधी मी सोडत नाही.
या कार्यक्रमात तू शोएब अख्तरसोबत काम करत आहेस. शोएब आणि तुझे खऱ्या आयुष्यातील संबंध कसे आहेत?
शोएब आणि मी खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. तो मला मोठ्या भावाप्रमाणेच आहे. शोएब आणि माझी दोघांचीही भाषा पंजाबी असल्याने आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारतो. शोएब खूपच जलद बोलतो. त्यामुळे कधी कधी तो काय बोलते हेच कळत नाही. त्यावरून तर आम्ही त्याची अनेकवेळा टर उडवायचो. मॅच संपल्यानंतरही आम्ही एकत्र जेवायचो. आमचे नाते हे खूपच घनिष्ट आहे. त्याला मी नेहमीच बोलतो, तू खूप चांगला कॉमेडी करतोस, त्यामुळे कॉमेडी कार्यक्रमात परीक्षण करण्यापेक्षा तू स्वतः कॉमेडी कर.
या कार्यक्रमाचे परीक्षण करणे कितपत कठिण आहे असे तुला वाटतेय?
कोणत्या नृत्याच्या अथवा संगीताच्या कार्यक्रमाचे परीक्षण करणे हे कठीण असते. पण कॉमेडी कार्यक्रमाचे परीक्षण करणे खूप सोपे असते. चांगला जोक असेल तर आपल्याला नक्कीच हसायला येते. त्यामुळे या कार्यक्रमाचे चित्रीकरण हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे.
अनेक कॉमेडी कार्यक्रम सध्या टीव्हीवर सुरू आहेत. या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे काय वेगळेपण तुम्ही ठेवणार आहात?
आमचा कार्यक्रम हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा असावा असे मला वाटते. त्यामुळे डबल मिनिंगच्या विनोदांना किंवा कंबरेखालच्या विनोदांना आमच्या कार्यक्रमात स्थान कधीही नसणार.
तुझा आवडता कॉमेडीयन कोण आहे?
कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर यांच्या कॉमेडीवर मी फिदा आहे. त्याचसोबत कृष्णा अभिषेक, राजू श्रीवास्तव, सुदेश लहरी यांची कॉमेडी मला खूप आवडते. आपल्या देशाप्रमाणे पाकिस्तानमध्येही खूप चांगले कॉमेडीयन आहेत असे मला वाटते.
छोट्या पडद्यानंतर आता मोठ्या पडद्यावर येण्याचा काही विचार आहे का?
मी चांगला अभिनेता नाहीये असे माझ्या पत्नीचे म्हणणे आहे. त्यामुळे तू शाहरुख खान बनण्याचा कधी प्रयत्नदेखील करू नकोस असे ती मला सतत सांगत असते. तिच्या या मतामुळे मी कधी चित्रपटात काम करण्याचा विचारदेखील करणार नाही.