'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके. हे कलाकार मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने सर्वांचे पाय अजून जमिनीवर आहेत. अशातच गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार त्यांच्या गावी जात आहेत. चिपळूणचे पारसमणी अशी ओळख असलेल्या प्रभाकर मोरेंनेही शूटिंगमधून ब्रेक घेऊन गणेशोत्सवात गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी प्रभाकर मोरेंनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांनी त्यांचं विशेष कौतुक केलं.
प्रभाकर मोरेंचा कोकणकन्याने प्रवास
प्रभाकर मोरे काल चिपळूणला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला आले होते. तेव्हा सेलिब्रिटी असल्याचा कोणताही आविर्भाव न दाखवता प्रभाकर मोरेंनी सामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभं राहून प्रवास करण्याचं ठरवलं. कोकणकन्या एक्सप्रेससाठी प्रभाकर मोरेंनी शांतपणे रांग लावली होती. प्रभाकर मोरेंचा हा स्वभाव बघून पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं. पोलिसांनी हातात माईक घेऊन प्रभाकर मोरेंचं कौतुक केलं.
पोलिसांनी सर्वांना सांगितलं की, ''जमिनीवरचा आणि मातीवरचा कलाकार प्रभाकरजी मोरे साहेब हे कोकणकन्या रेल्वेने आपल्या गाववाल्यांसोबत अगदी रांगेमध्ये उभे राहून दाटीवाटीने प्रवास करुन हा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जात आहेत. खरोखरंच हा मातीचा कलाकार आहे. आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.'' अशा शब्दात पोलिसांनी प्रभाकर मोरेंचं कौतुक करुन ते सर्वांसाठी आदर्श आहेत, असं दाखवलं. प्रभाकर मोरेंचा हा स्वभाव त्यांच्या चाहत्यांनाही आवडला आहे. चिपळूणचे पारसमणी सध्या गावी गणपती उत्सवाला गेले आहेत.