Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ आले पुन्हा एकत्र, दिसणार 'मुलगी पसंत आहे' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 18:33 IST

Harshada Khanvilkar And Sangram Samel : 'मुलगी पसंत आहे' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ या दोघांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेत्री कल्याणी टिभे ही देखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सासू आणि सून ही जोडी जगा वेगळीच असते. त्यांच्यातलं प्रेम कधी फुलेल आणि कधी अचानक तेच प्रेम आटेल याचा कोणी अंदाज घेऊ शकत नाही. आतापर्यंत मालिकांमध्ये सासू आणि सून ही दोन पात्रं वेगवेगळ्या स्वभावानी दाखवण्यात आली. सन मराठीवर लवकरच 'मुलगी पसंत आहे' ही नवीन मालिका सुरु होतेय आणि त्या मालिकेत ही दोन पात्रं थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ या दोघांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेत्री कल्याणी टिभे ही देखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेत सासूची भूमिका साकारली आहे तर कल्याणी सूनेच्या भूमिकेत दिसणार आहे. संग्राम समेळ याने मुलाची भूमिका साकारली आहे. चंद्रासारखी तेजस्वी, तिचं बोलणं मधासारखं गोड, मन नदी सारखं निर्मळ अशी ही सून घरी आली खरी पण तिच्या मनात काहीतरी शिजतंय हे नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या प्रोमो मधून समोर आले आहे. पण असं का आणि सासूच्या कोणत्या वागणूकीचा बदला सून घेणार? सासू जितकी सोज्वळ दिसते तशीच ती असेल का? सून कोणत्या हेतून घरात प्रवेश करणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मालिकेत मिळतील. 

लेखिका रोहिणी निनावे यांनी ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेची कथा आणि पटकथा लिहिली आहे. संवाद मृणालिनी जावळे यांनी लिहिले आहेत तर सुश्रुत भागवत यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निलेश मोहरीर यांनी या मालिकेला संगीत  दिलं आहे. ही सगळी अप्रतिम टीम एकत्र आल्यामुळे मालिका प्रेक्षकांची मने जिंकणार यात काही शंका नाही.

टॅग्स :संग्राम समेळ