Join us

हर्ष तीन तास राहिला एका सीनसाठी पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 15:46 IST

अंश राठोडची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मालिकेतील एका प्रसंगासाठी त्याने अलीकडेच स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षणही घेतले.

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका रंगविणारा अभिनेता हर्ष राजपूत हा आपली भूमिका वास्तववादी रंगविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आताही त्याने अंश राठोडची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मालिकेतील एका प्रसंगासाठी त्याने अलीकडेच स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षणही घेतले.

हर्ष सांगतो, “मला पाण्याखाली एक स्टंट प्रसंग साकारायचा आहे, हे समजताच मला अतिशय आनंद झाला. या प्रसंगासाठी मला पाण्याखाली तीन तास राहावे लागणे ही पटकथेची मागणी होती. मला स्कूबा डायव्हिंग येत नसल्याने हा प्रसंग थेट ऐनवेळी उभा करणं मला शक्य नव्हतं. तेव्हा उत्तम शॉट देता यावा यासाठी मी सलग दोन दिवस स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीला मी काहीसा चिंताग्रस्त होतो खरा, पण सारं काम पार पडल्यावर मला एक थरारक अनुभव मिळाला. मला हा प्रसंग साकारताना खूपच मजा आली आणि प्रेक्षकांनाही हा प्रसंग पाहताना थरारकतेचा तसाच अनुभव येवो, हीच माझी इच्छा आहे.” आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास हर्ष नेहमीच सिध्द असतो. आता आपल्या या पाण्याखालील स्टंटप्रसंगाने तो प्रेक्षकांना थरारकतेचा नवा अनुभव देण्यास तयार झाला आहे.

नजर मालिकेत दुष्ट खलनायक आणि अमानवी शक्तींची अंगावर काटा आणणारी कथा आणि कॉलेजातील प्रेमकथा यांचा मिलाफ झाला आहे. प्रेक्षकांना अंश लवकरच एका सामान्य तरुण मुलाच्या रूपात दिसेल. त्याला आपले खरे आई-वडील कोण आणि त्यांचे काय झाले, याची काहीही कल्पना नसते.  

 

टॅग्स :नजर