Join us
Daily Top 2Weekly Top 5

​गुरदीप कोहली पृथ्वी वल्लभमध्ये झळकणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 17:02 IST

संजीवनी, सिंदूर तेरे नाम का, भाभी यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली गुरदीप कोहली प्रेक्षकांना पहिल्यांदाच एका पौराणिक मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

संजीवनी, सिंदूर तेरे नाम का, भाभी यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली गुरदीप कोहली प्रेक्षकांना पहिल्यांदाच एका पौराणिक मालिकेत पाहायला मिळणार आहे. पृथ्वी वल्लभ या आगामी मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आजवर कधीच पौराणिक मालिकेत काम केले नसल्याने या मालिकेत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा असल्याचे ती सांगते. या मालिकेच्या चित्रीकरणाला गुरदीपने सुरुवात केली असून या मालिकेतील तिचा लूकदेखील खूपच वेगळा आहे. या मालिकेत तिला भरजरी वस्त्रं आणि खूप साऱ्या दागिन्यांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेविषयी तिला विचारले गेले असता तिने क्षणात या मालिकेसाठी होकार दिला होता. याविषयी गुरदीप सांगते, पृथ्वी वल्लभ ही माझी पहिली पौराणिक मालिका आहे. आजवर मी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण कधीच मला पौराणिक मालिकेत काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे एक आव्हान म्हणून ही मालिका मी स्वीकारली. या मालिकेत मी उज्ज्वला ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा मृणाल असून तिच्या आईची भूमिका मी साकारत आहे. उज्जवला हे या मालिकेतील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे. मृणाल लहानपणापासून तिच्या आईकडूनच चांगली मूल्ये शिकली असून तिची शिकवण मृणालसोबत कायम राहते. मृणालला ती युद्धाच्या डावपेचाचे धडे देते, कुटुंबाला एकत्र ठेवण्याची कला आणि जीवन जगण्याची कला तसेच उज्ज्वलाच्या पश्चातही ती शिकवण कसोशीने कशी जीवनात उतरवावी हे शिकवते, ज्यामुळे मृणालचे व्यक्तिमत्व सुंदर बनते. मृणाल लहानपणीच ही मूल्ये आत्मसात करून एक योद्धयाचा वारसा चालवते. या मालिकेतील भूमिका मला प्रचंड आवडल्याने मी या मालिकेत काम करण्याचा विचार केला. या मालिकेत मी आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ही मालिका स्वीकारताना माझी भूमिका ही आईची असल्याने मी ही भूमिका स्वीकारू की नाही हा विचार मी क्षणभरही केला नव्हता. या भूमिकेला अनेक पैलू असून एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका साकारायला खूपच मजा येत आहे. Also Read : ​पृथ्वी वल्लभमध्ये सीमा बिस्वास साकारणार महत्त्वाची भूमिका