'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या गाजलेल्या कार्यक्रमाने १० वर्ष सर्वांचं मनोरंजन केलं. डॉ निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांची हवाच होती. मात्र नंतर टीआरपी कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी कार्यक्रमाने निरोप घेतला. आता 'चला हवा येऊ द्या' नवीन ढंगात, नव्या फॉर्मॅटमध्ये परत येत आहे. श्रेया बुगडे, कुशल आणि भारत गणेशपुरे हे आधीचेच कलाकार आहेत. तर गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव यांची नव्याने एन्ट्री झाली आहे. याशिवाय आणखी एक मराठी अभिनेता कार्यक्रमात दिसणार आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात गौरव, श्रेया, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके मेंटॉरच्या भूमिकेत आहेत. म्हणजेच ते परीक्षकाच्या खुर्चीवर असल्याचं दिसत आहे. तसंत ते स्किट्सही करतील अशीही झलक प्रोमोमधून दिसली आहे. अभिजीत खांडकेकर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. दरम्यान नुकत्याच आलेल्या आणि सुपरहिट झालेल्या 'गुलकंद' सिनेमात प्रसाद ओक आणि ईशा डेच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता तेजस राऊतही (Tejas Raut) आता चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार आहे. गौरवसोबतचा त्याचा एक कॉमेडी सीन झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तेजस राऊतने नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमातही काम केले आहे. याशिवाय त्याने नाटक आणि वेबसीरिजही केल्या आहेत. 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्येही तो होता. आता 'चला हवा येऊ द्या'मधून तो हास्याचे फवारे उडवायला सज्ज झाला आहे.