आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर गायक संजू राठोड त्याचं नवं गाणं “शेकी” घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच हे गाणं त्याच्या युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. “शेकी” हे गाणं संजू राठोड याने स्वतः गायलं, लिहिलं आणि संगीतबद्धही केलं आहे. या गाण्यातून संजू आधुनिक साऊंड्स आणि सांस्कृतिक मुळांतील खडखडीत भावना यांचं एक जबरदस्त मिश्रण करून घेऊन आला आहे.
जी-स्पार्कच्या खास उच्च-ऊर्जा प्रोडक्शनखाली तयार झालेलं हे गाणं मराठी लोकसंगीताच्या मातीतल्या गंधाला अफ्रिकन बीट्सच्या जोशात मिसळतं. एक असं फ्युजन जे ताजेपण देतं आणि लगेचच मनात घर करतं. उत्साहात भर टाकतं. या गाण्यात बिग बॉस फेम ईशा मालवीय झळकली आहे. ईशा पहिल्यांदाच संजूसोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यांची हटके केमिस्ट्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरेल.
“शेकी” या गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना संजू म्हणाला, "हे गाणं तयार करणं म्हणजे पारंपरिक आणि ग्लोबल यांच्यात एक बारीक दोरावर चालण्यासारखं होतं. मी देसी आत्मा जपताना नव्या साउंड्सचा प्रयोग करायचा प्रयत्न केला. ईशासोबत पहिल्यांदा काम करणं एक जबरदस्त अनुभव होता. ती स्क्रीनवर खूपच ऊर्जा आणि ग्रेस घेऊन आली. त्यामुळे गाण्याचा मूडच बदलून गेला. ‘शेकी’ हे मराठी पॉप संस्कृतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या माझ्या प्रवासातील पहिलं पाऊल आहे. ही पुढची मोठी लाट असेल, हे नक्की.”
“गुलाबी साडी”च्या प्रचंड यशानंतर आणि “काली बिंदी”वरील सततच्या प्रेमानंतर, संजू राठोडचे हे गाणं आता मराठी पॉप संस्कृतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतं. “शेकी” ही केवळ एका हिट गाण्याची पुढची कडी नाही – तर हे एक ठाम स्टेटमेंट आहे. संजू राठोडने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, आपली सांस्कृतिक ओळख जपत, तो कोणत्याही सीमांचे बंधन मानत नाही. त्याचा आवाज हा धाडसी, जमिनीवरचा आणि पूर्णपणे त्याचा स्वतःचा आहे. त्याच्या आकर्षक साऊंडमुळे आणि सांस्कृतिक समृद्धतेमुळे “शेकी” लवकरच सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये गाजणार, हे निश्चित.