Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहा जोशीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!, छोट्या पडद्यावर दिसणार ऐतिहासिक भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:55 IST

Spruha Joshi : स्पृहा लवकरच छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री आणि सूत्रसंचालिका अशा विविध भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi). स्पृहाने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केले आहे. मात्र गेल्या काही काळापासून स्पृहा कोणत्याच मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिचे चाहते तिला पुन्हा मालिकेत काम करताना पाहण्यासाठी प्रतिक्षा करत आहेत. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. स्पृहा लवकरच छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. स्पृहाने पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

स्पृहाने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत नव्या मालिकेविषयी सांगितले आहे. स्पृहा लवकरच झी मराठी वाहिनीवरील 'लोकमान्य' मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ शेअर करत स्पृहा जोशीने लिहिले की, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’नंतर ८ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर एका नव्या मलिकेत. एका नवीन भूमिकेत लोकमान्य. स्पृहाने ही पोस्ट शेअर करताच चाहते तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

स्पृहा जोशीने यापूर्वी झी मराठीवरील 'उंच माझा झोका' मालिकेतील रमाबाई रानडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. स्पृहाला आता पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. त्यामुळे चाहते स्पृहा जोशीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनवर ही नवीकोरी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका अभिनेता क्षितीश दाते साकारणार असून त्यांच्या पत्नीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी साकारणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे.
टॅग्स :स्पृहा जोशी