'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता अभिनेत्री गिरिजा प्रभू 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच या मालिकेनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा गिरिजा आणि मंदार जाधव ही जोडी छोट्या पडद्यावर झळकत आहे. या मालिकेत गिरिजा कावेरी ही भूमिका साकारत आहे. तर मंदार जाधव यशच्या भूमिकेत आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका सुरुवातीपासून रंजक वळण घेत आहे. मालिकेत कावेरी आणि उदयचा अपघात झाल्यानंतर कावेरी त्यांच्या मुलाची चिकूची जबाबदारी घेत असल्याचं दिसत आहे. कावेरी चिकूला घेऊन धर्माधिकाऱ्यांच्या घरी येते. पण, सुलक्षणा मात्र तिचा स्वीकार करत नाही. घरात स्थान हवं असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येतं. त्या तलावात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. मात्र कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावात उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.
मालिकेतील हा सीन करणं गिरीजा प्रभूसाठी आव्हानात्मक होतं. साडी नेसून तलावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे. कुडाळ येथील वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं जाळं यामध्ये शूट करणं जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने चिखलात उतरत यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला. जवळपास तीन तास या सीनचं शूट सुरु होतं. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे असं अभिनेत्री गिरीजा म्हणाली. आता पुढे 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका कोणतं रंजक वळण घेणार हे पाहावं लागेल.