Join us

CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

By ऋचा वझे | Updated: July 12, 2025 16:56 IST

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला....

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More)  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचला. गेल्यावर्षीच त्याने हास्यजत्रेला रामराम केला. यानंतर तो इतर सिनेमा, सीरिज या माध्यमात दिसला. आता तो पुन्हा महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'चला हवा येऊ द्या'चं (Chala Hawa Yeu Dya) नवं पर्व लवकरच येत आहे. यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे जुने कलाकार आहेत. तर गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव नव्याने सामील झाले आहेत. मात्र या पर्वात डॉ निलेश साबळे (Nilesh Sabale) दिसणार नाहीत. मध्यंतरी निलेश साबळे चर्चेतही आले होते. याविषयी गौरव मोरेला विचारलं असता तो काय म्हणाला वाचा.

निलेश साबळे यांच्यावर राशीचक्रकार शरद उपाध्येंनी पोस्ट लिहिली होती. या मध्ये निलेश साबळेंच्या डोक्यात कशी हवा गेली होती असं त्यांनी लिहिलं होतं. नंतर निलेश साबळेंनी त्यांना व्हिडिओ शेअर करत सडेतोड उत्तर दिलं होतं. 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात निलेश साबळे दिसणार नाहीत. त्यांची आठवण येईल का? त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर तुझी प्रतिक्रिया काय? असं गौरव मोरेला विचारण्यात आलं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "जे घडलं तेव्हा मी मुंबईबाहेर होतो. मला दोन दिवस नेटवर्क नव्हतं.  त्यामुळे मला काहीच कल्पना नाही. तसंही मी फार कुणाच्या संपर्कात नसतो. मी आधीच्या पर्वात त्यांच्यासोबत कामच केलं नसल्याने मला नक्की काय झालं होतं याची कल्पना नाही. मी आधीच्या फॉर्मॅटमध्ये मी नव्हतोच. त्यामुळे मी त्याविषयी काहीच सांगू शकत नाही."

'चला हवा येऊ द्या' विषयी

गौरव मोरेने पाच वर्ष काम केल्यानंतर हास्यजत्रा सोडली होती. कोव्हिडच्या काळात हास्यजत्रेला लोकांनी उचलून धरलं होतं. चला हवा येऊ द्या च्या नवीन पर्वाबद्दल तो म्हणाला, "चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने १० वर्ष महाराष्ट्राला हसवलं आहे. मीही या कार्यक्रमाचा मोठा चाहता होतो. सर्वात जास्त टीआरपी मिळवणारा हा शो होता. 'चला हवा येऊ द्या'च्या आधीच्या पर्वात मी नव्हतोच. आता मी यामध्ये नवीन खेळाडून म्हणून जात आहे. आता माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. नवं वर्ष, नवीन चॅनल, नवी माणसं त्यामुळे माझी शून्यातून सुरुवात होणार आहे.  फ्रेश सुरुवात असं मी म्हणेन. त्याच हिशोबाने मला काम करावं लागेल. लोक मला ओळखतात, सगळं चालून जाईल असा विचार करुन चालत नाही."

टॅग्स :निलेश साबळेमराठी अभिनेताचला हवा येऊ द्यामहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजन